छत्तीसगड : चकमकीत ९ नक्षलवाद्यांचा खात्मा; दोन जवान शहीद

रायपूर : वृत्तसंस्था – छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत ९ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं असून, दोन जवान शहीद झाले आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुकमा जिल्ह्यातील किस्टाराम पोलीस हद्दीत ही चकमक उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगड आणि तेलंगण सीमेवर नक्षलवादी लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर सीमा सुरक्षा दल आणि विशेष कृती दलाचं संयुक्त पथक घटनास्थळी रवाना करण्यात आलं. या अभियानाला ‘प्रहर चार’ असं नाव देण्यात आलं होतं. किस्टाराम पोलीस हद्दीत हे पथक पोहोचताच नक्षलवाद्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला. या गोळीबारास सुरक्षा दलाच्या जवानांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. दोन्ही बाजूकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला, यामध्ये ९ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. तर दोन जवान शहीद झाले आहेत. अद्यापही तेथे गोळीबार सुरू असल्याची माहिती असून शहीद झालेल्या दोन्ही जवानांचे मृतदेह घटनास्थळावरुन काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी अतिरिक्त फौज पाठवण्यात आली आहे, अशी माहिती नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महासंचालक डी. एम. अवस्थी यांनी दिली.

यापूर्वी आज सकाळी सुकमा जिल्ह्यातील चिंतागुफा येथेही नक्षली आणि सुरक्षारक्षकांमध्ये चकमक उडाली होती, यामध्ये एका जखमी नक्षलवाद्याला अटक करण्यात आली.