ढाबा चालकाच्या खून प्रकरणात आठ जणांना अटक

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – पेट्रोल पंप आणि हॉटेलमधील हिस्सा दिला नसल्याच्या कारणारवरुन कडोली येथील सम्राट निकम (वय-२८) याचा मंगळवारी (दि.१५) दुपारी चारच्या सुमारास खून करण्यात आला होता. याप्रकरणात पोलिसांनी आठजणांना अटक केली आहे.

मयूर राजेंद्र जाधव, बाळकृष्ण जाधव, शशिकांत जाधव, विजय दिनकर जाधव, बाळासाहेब तांगडे (सर्व रा. कोडोली, सातारा), सौरभ खरात ऊर्फ कुक्या, धीरज शेळके, संग्राम दणाणे (सर्व रा. मल्हार पेठ, सातारा) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत.

मंगळवारी दुपारी दुचाकीवरून घरी जात असताना सम्राट चौकामध्ये दबा धरून बसलेल्या आरोपींनी हॉटेल व्यावसायिक सम्राट निकम याच्यावर अचानक हॉकी स्टिक आणि सत्तूरने वार केले. यात सम्राटचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर पोलिसांनी धरपकड करून आठजणांना ताब्यात घेतले आहे. मात्र, अद्याप या प्रकरणातील तीन ते चारजण फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. जुना वाद आणि हॉटेल व पेट्रोल पंपाचा हिस्सा दिला नाही, या कारणावरून संबंधितांनी कट रचून हा खून केला असल्याचे सम्राट निकमचे चुलते संजय निकम (वय ५१, रा. कोडोली सातारा) यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

ढाबा चालकाचा धारदार शस्त्राने सपासप वार करून खून