सख्खा भाऊ बनला पक्का वैरी ; मोठ्याने केला लहान्याचा खुन

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – किरकोळ कारणावरून भांडण होऊन मोठ्या भावाने लहान भावाच्या डोक्यात घरातील बरणी आणि विटा घालून खुन केल्याची घटना मजरेवाडी परिसरातील विमानतळ संरक्षण भिंतीजवळील बेघर वसाहत येथे घडली. संतोष किसन सावंत (वय ३०, व्यवसाय- मजुरी) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी नंदकुमार किसन सावंत याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष सावंत आणि नंदकुमार सावंत हे दोघे सख्खे भाऊ आहेत. शुक्रवार, ११ जानेवारी रोजी मध्यरात्री अज्ञात कारणावरून या दोघांमध्ये वाद झाला. यावेळी रागामध्ये येऊन नंदकुमार सावंत याने लहान भाऊ संतोष सावंत यांच्या डोक्यामध्ये घरातील बरणी आणि विटा घातल्या. यामध्ये गंभीर जखमी होऊन संतोष हा जागीच निपचित पडला. विशेष म्हणजे, आपला भाऊ संतोष याचा आपण खुन केला, असे नंदकुमार यानेच परिसरातील किराणा दुकानदारास सांगितले.

दुकानदार उदंडे यांनी ही घटना संतोष यांच्या पत्नी कल्पना सावंत यांना त्यांच्या माहेरी जाऊन सांगितली. यावेळी कल्पना सावंत यांनी मजरेवाडी येथील घरी जाऊन पाहिल्यानंतर संतोष हा रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडला होता. त्याच्या डोक्यातून रक्त वाहिलेले होते. तसेच घरामध्ये बरणीचे आणि फरशीचे तुकडे पडलेले होते. ही वार्ता कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. याबाबत कल्पना सावंत यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार हे करत आहेत.