राम मंदिर बांधण्यासाठी भाजपला मत द्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आधुनिक भारतात प्राचीन संस्कृतीचा सन्मान करणे महत्वाचे आहे कारण आपण आपल्या संस्कृतीला विसरलो तर किती हि विकास केला तरी देश पुन्हा परक्याच्या पारतंत्र्यात जाऊ शकतो असे वक्तव्य खा. सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे. भारत विकास परिषद आयोजित “आधुनिक भारताची परिकल्पना : भविष्यातील मार्ग” या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित केले होते त्यात ते बोलत होते. हे व्याख्यान चेंबूर येथे पार पडले आहे.

भारतात संस्कृत आणि देवनागरी लिपी अनिवार्य केली पाहिजे. मोजायला गेले तर इंग्रजी सहित सर्वच भाषांमध्ये संस्कृत शब्द अधिक आहेत. त्यामुळे संस्कृतची आवश्यकता आहे. देशाच्या पाठयपुस्तकात भारताचा अभिमानास्पद इतिहास असणे आवश्यक आहे मात्र त्याच्या ऐवजी पाठयपुस्तकात मुघल आणि इंग्रजांच्या गुलामगिरीचे तंत्र आपणाला शिकवले जाते. हि पाठ्यपुस्तके बदलण्याची आवश्यकता आहे असे सुब्रमण्यम स्वामी म्हणाले आहेत.

राम मंदिराचे काम सुरु करण्यासाठी न्यायालयीन परवानगीची आवश्यकता नाही. त्या जागी पूर्वी राम मंदिरच होते हे आता सर्वांनी मान्य केले आहे. त्याच प्रमाणे नरसिंह राव यांनीच या जागेचे राष्ट्रीयकरण केले आहे. त्यामुळे या जागी न्यायालयाचा कोणताच अधिकार चालत नाही. त्यामुळे मूळ मालकाला किती भरपाई द्यायची याचा निर्णय फक्त न्यायालय घेऊ शकते. त्यामुळे राम मंदिराच्या उभारणीसाठी सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपला निवडून देण्याचे आवाहन केले आहे.