शिवसैनिकावर झालेल्या हल्ल्याने अहमदनगर मतदानात तणावपूर्ण शांतता 

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – सबंध महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीत वार्ड क्रमांक १२ मध्ये काल रात्री शिवसैनिक सागर थोरात यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला झाल्याने आता पालिकेच्या मतदानात तणाव पूर्ण शांतता पसरली आहे. काही भागात लोक उत्साहात मतदानासाठी बाहेर पडत आहेत. तर काही भागात मतदारांनी अल्प प्रतिसाद दिला आहे.  दरम्यान शिवसैनिकाच्या हल्ल्यामागे  शहर भाजपचा हात आहे असा आरोप शिवसेनेने केला आहे.

अहमदनगर पालिकेवर भाजप सत्तेवर येणार आहे म्हणून शिवसेनेच्या पाया खालची जमीन सरकली आहे असे म्हणत भाजपचे नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी शिवसेनेचे आरोप फेटाळून लावले आहेत. मतदानाच्या आदल्या रात्री अशी घटना घडल्याने मात्र मतदानावर तणावपूर्ण शांतता पसरली आहे.

अहमदनगरला  पालिकेच्या ६८ जागांसाठी ३३९ उमेदवार रिंगणात आहेत. २ लाख ५६ हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत असून ७३ इमारतींमध्ये  ३३७ मतदान केंद्रे आहेत. या पैकी ४१ मतदान केंद्रे अतिसंवेदनशील तर १३७ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. गत निवडणुकीत सेने भाजपा युतीला सत्ता कमावण्यात नगरमध्ये यश मिळाले होते. शिवसेनेचा महापौर तर भाजपचा उपमहापौर असा दोघांचा सत्तेत सहभाग होता. परंतु सेना भाजपमध्ये राज्याच्या सत्तेतून आलेले वितुष्ठ नगरच्या महानगर पालिका निवडणुकीत महत्वाचे ठरणार आहे. कारण दोघांच्या मतांचे ध्रुवीकरण होऊन त्याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच नगर शहराचे मागील काही दिवसांचे वातावरण बघता भाजप निवडणुकीच्या निकालात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येऊ शकतो असा मतप्रवाह सर्वत्र आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यात शहराच्या पालिका सत्तेसाठी मोठी चुरस लागली असल्याचे चित्र आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांसहित २ हजार पोलीस नगरच्या मतदानात शांततेसाठी तैनात करण्यात आले आहेत. तर २ हजार निवडणूक कर्मचारी मतदारांचे मतदान नोंदवून घेत आहेत.  गत निवडणुकीत महानगरपालिकेच्या स्थापने पासून प्रथमच शिवसेनेचा महापौर झाला होता. तर या निवडणुकीत सेना भाजप यांच्यासह काँग्रेस आघाडी यांच्यात निवडणुकीची तिरंगी रंगत आहे.