नोकरदारांसाठी खुशखबर ! नव्या वर्षात मिळणार ‘११ लाँग वीक एंड्स’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वीक एंडला जोडून आणखी जर एक सुट्टी मिळणार असेल तर मग मोठी पर्वणीच लाभल्याचा आनंद नोकरदारांना होतो. अशा लाँग वीक एंड्सकडे अनेकांचे लक्ष असते. अशा लोकांसाठी येणारे वर्ष आनंददायक ठरणार आहे. कारण येत्या वर्षात म्हणजेच २०१९ साली एक दोन नव्हे तर तब्बल ११ लाँग वीक एंड्सचा योग जुळून आला आहे. अगदी वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच जानेवारी महिन्यापासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत जोडसुट्ट्या सुरू राहणार आहेत.

जानेवारी महिन्यामध्ये तीन दिवसांचा पहिला लाँग वीक एंड मिळणार आहे. १२ जानेवारी रोजी शनिवार आहे, तर १३ जानेवारीला रविवार आहे, तसेच १४ जानेवारी रोजी सोमवारी मकरसंक्रांती, पोंगल आहे. त्यामुळे पहिल्याच महिन्यात सनाला जोडून तीन सुट्ट्या आल्या आहेत. फेब्रुवारी महिना हा सुका जाणार असून यामध्ये एकही लांब सुट्ट्यांचा काळ नाही. मात्र त्याची कसर मार्च महिन्याने भरून काढली आहे. मार्च महिन्यात सुट्ट्यांची मोठी जंत्री आहेत. २ मार्चला शनिवार असून ३ मार्चला रविवार, तर ४ मार्चला सोमवारी महाशिवरात्रीची सुट्टी आहे. (म्हणजे १ मार्च रोजी जर सुट्टी टाकली तर सलग चार दिवस सुट्टीचा आनंद घेता येणार आहे.) तसेच २१ मार्चला गुरुवारी होळीची सुट्टी, तर २३ मार्चला शनिवार आला आहे. २४ मार्चला रविवार आहे. (म्हणजे २२ मार्चला सुट्टी घेतल्यास चार दिवस धम्माल करण्यासाठी मिळणार आहेत.) एप्रिल महिनादेखील सुट्ट्यांसाठी चांगला आहे. १३ एप्रिलला शनिवार असून १४ एप्रिल रोजी रविवार (बैसाखी, रामनवमी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती) आहे. तर पुढे १५ आणि १६ एप्रिल असे दोन दिवस जर सुट्टी घेतली, तर १७ एप्रिलला बुधवारी महावीर जयंतीची सुट्टी आहे. १९ एप्रिलला शुक्रवारी गुड फ्रायडे आहे. २० एप्रिलला शनिवार, तर २१ एप्रिलला रविवार (इस्टर संडे) आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये बाहेर जाण्यासाठी एप्रिल महिन्यात सुट्ट्यांची चंगळच असणार आहे.

मे महिना हा सुट्ट्यांसाठी इतकासा चांगला नाही. १० तारखेला सुट्टी घेतलीत, तर पुढे ११ आणि १२ मे रोजी शनिवार-रविवारची सुट्टी आहे. जून आणि जुलै महिन्यात जास्त सुट्ट्या नाहीत. थेट ऑगस्ट महिन्यात सुट्ट्यांसाठी चांगला हंगाम आहे. १० ऑगस्टला शनिवार, तर ११ ऑगस्टला रविवार आहे. तसेच १२ ऑगस्ट रोजी सोमवारी बकरी ईदची सुट्टी तर मध्ये दोन दिवस सोडले, तर १५ ऑगस्टला गुरुवारी स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधनाची सुट्टी आहे. १७ ऑगस्टला शनिवार, पारसी न्यू इयरची, तर १८ ऑगस्टला रविवारची सुट्टी आहे. ३१ ऑगस्टला शनिवार आहे, तर लगेच सप्टेंबर महिन्याची सुरुवात रविवारपासून होत आहे. २ सप्टेंबरला सोमवार, गणेशचतुर्थी आहे. ७ सप्टेंबरला शनिवार आहे. ८ सप्टेंबरला रविवार असून १० सप्टेंबरला मंगळवारी मोहरम आहे. ११ सप्टेंबरला बुधवारी ओणमची सुट्टी मिळणार आहे. ऑक्टोबर महिना हा सुट्ट्यांसाठी चांगला आहे. ५ ऑक्टोबरला शनिवार आहे, तर ६ ऑक्टोबरला रविवारची सुट्टी आहे. ८ ऑक्टोबरला मंगळवारी दसरा आणि दुर्गापूजा आहे. २६ ऑक्टोबरला शनिवार, तर २७ ऑक्टोबरला रविवार, तर २८ ऑक्टोबरला सोमवारी दिवाळीची सुट्टी आहे. मंगळवारी २९ ऑक्टोबरला भाऊबीजची सुट्टी आहे. नोव्हेंबर महिन्यात कमी सुट्ट्या आहेत. ९ नोव्हेंबरला शनिवार आहे, तर १० नोव्हेंबरला रविवार तसेच ईद-ए-मिलाद आहे. १२ नोव्हेंबरला गुरुनानक जयंतीची सुट्टी आहे. अशाप्रकारे जानेवारीपासून नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक महिन्यात लाँग वीक एंड्सची मजा घेता येणार आहे.