शरद पवारांच्या हेलिकॉप्टरचे अचानक लँडिंग

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाईन- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरमधील सीटबेल्ट बाहेरच राहिल्यामुळे उड्डाण घेतल्यानंतर सात मिनिटांनी हेलिकॉप्टर पुन्हा लॅण्डिंग करावे लागले. मैदानावर अचानक आलेले हेलिकॉप्टर पाहून तेथे खेळणाऱ्या मुलांची धांदल उडाली.

नगरमधील लालटाकी येथील शिक्षक विकास मंडळाचा कार्यक्रम आटोपून पवार पुण्याला जाण्यासाठी हेलिकॉप्टरने निघाले होते. रेसिडेन्शीअल कॉलेजच्या मैदानावर तयार केलेल्या हेलिपॅडिवरुन पवार यांच्या हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले. हेलिकॉप्टर गेल्यानंतर मैदानावर मुले सायकलिंग करीत होती. सुमारे सात मिनिटानंतर हे हेलिकॉप्टर पुन्हा मैदानाच्या दिशेने आले. त्यावेळी सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस गाड्यांमधून रवाना होत होते. मात्र, हेलिकॉप्टर आल्याचे पाहून पोलिसांचीही तारांबळ उडाली. सायकलिंग करणाऱ्या मुलांनीही जोरात पळ काढला.

नुकतेच उड्डाण घेतलेले हेलिकॉप्टर पुन्हा आल्याचे पाहून पोलीसही संभ्रमात पडले. हेलिकॉप्टर लॅण्ड झाले. पायलटने सुमारे १५ सेकंदात दरवाजा उघडून पुन्हा बंद केला आणि हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले.