एन्काऊंटर फेम राम जाधव यांची पिंपरी चिंचवड आयुक्तालयात नियुक्ती

पिंपरी :पोलीसनामा ऑनलाईन-महाकाली आणि शाम दाभाडे या कुख्यात गुंडांचा एन्काऊंटर करणारे राम जाधव यांची पिंपरी चिंचवड आयुक्तालयात नियुक्ती करण्यात आली आहे. राम जाधव यांच्यासह नीलिमा जाधव यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.

नव्याने सुरु झालेल्या पिंपरी चिंचवड आयुक्तालयासाठी दोन सहायक पोलीस आयुक्तांची (ACP) आज नियुक्ती करण्यात आली आहे.

नव्याने सुरु झालेल्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयास सहायक पोलीस आयुक्तांची ७ पदे शासनाने मंजुर केली आहे. मात्र, त्यापैकी तीन जणांची नियुक्ती यापूर्वी करण्यात आली होती.

तर ४ जागा रिक्त होत्या. गृह विभागाने आज (सोमवारी) सायंकाळी उशिरा केलेल्या बदल्यांमध्ये पिंपरी-चिंचवड करिता चार रिक्त जागा पैकी दोघांची नियुक्ती केली आहे. दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक आयुक्त रामचंद्र जाधव आणि नागपूर येथे नियुक्त असणाऱ्या सहाय्यक आयुक्त नीलिमा जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर अजूनही दोन जागा रिक्त आहेत.

रामचंद्र जाधव यांनी यापूर्वी पुणे, नवी मुंबई आणि पुणे ग्रामीण पोलीस दलात विविध पदावर कर्तव्य बजावले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला कुख्यात गुन्हेगार शाम दाभाडे यांच्यासह त्याचा साथीदार धनंजय शिंदे यांचा चाकण येथील  वाकसाई देवी डोंगरामध्ये राम जाधव यांनी एन्काऊंटर केला होता. तसेच देहूरोड परिसरात दहशत पसरवणाऱ्या महाकालीचा देखील एन्काऊंटर राम जाधव यांनी केला आहे.