‘छत्रपती शिवाजी’ चित्रपटातील रितेशचा ‘तो’ लूक व्हायरल

मुंबई : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांपासून रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट येणार आहे अशी चर्चा सुरु आहे. यात अभिनेता रितेश देशमुख शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे असे बोलले जात होते. याच्या प्रतिक्षेत असणाऱ्या चाहत्यांसाठी आनंदाची बाब समोर आली आहे.  या चित्रपटातील रितेशचा पहिला लूक नुकताच समोर आला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते रवी जाधव यांचा ‘छत्रपती शिवाजी’ हा चित्रपट लवकरच आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे समजत आहे.

या लुकमधील रितेशची योद्ध्याची वेशभूषा असून दाढी आणि कपाळावर चंद्रकोर आहे. यात रितेश काही वेगळाच आणि जबरदस्त दिसत आहे. त्याचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वीच रितेशन स्वत:च सोशल मीडियावर पोस्ट टाकत या चित्रपटाबाबत माहिती दिली होती. यानंतर मात्र प्रेक्षकांमध्ये याची चांगलीच चर्चा रंगली होती. परंतु यानंतर बरेच दिवस याची कसलीही हालचाल दिसली नाही. बराच काळ लोटल्याने प्रेक्षकांची उत्सुकताही चांगलीच ताणली गेली होती. खूप दिवस प्रतिक्षा करत असलेल्या प्रेक्षकांची उत्सुकता अखेर संपली आहे.