facebook च्या नव्या धोरणामुळे असंख्य राजकारणी मोठ्या संकटात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फेसबुकने आपल्या रचनेत महत्त्वाचे बदल केले आहेत. हे बदल येत्या २७ फेब्रुवारी पासून लागू होणार असल्याचे फेसबुकने आज (सोमवार) जाहिर केले. फेसबुकवरील अपप्रचार रोखण्यासाठी फेसबुकने हे महत्वाचे बदल केले आहेत. या नव्या बदलानुसार फेसबुक युजर्स राजकीय जाहिरात ‘पब्लिश्ड बाय’ किंवा ‘पेड फॉर बाय’ अशा डिस्क्लेमरसह पाहू शकतील. या नवीन बदलानुसार जाहिरातदाराला आपली ओळख द्यावी लागणार आहे.

तसेच फेसबूक कडून एका जाहिरात लायब्ररीवरही काम करण्यात येत आहे. यामध्ये युजर्स राजकारणाशी संबंधीत या जाहिरातीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ शकतात. पब्लीश केलेल्या जाहिरातीला किती खर्च आला आणि ही जाहिरात किती लोकांपर्यंत पोहचली आणि किती जणांनी पाहिली हे या लायब्ररीतून कळेल.

राजकीय जाहिराती बनवणाऱ्या व्यक्तींचं कंट्री लोकेशनदेखील पाहता येणार आहे. ते ठराविक फेसबुक पेज नेमकं कुठलं आहे, ते यामुळे समजणार आहे. ज्या जाहिरातींना डिसक्लेमर नसेल त्या जाहिरात लायब्ररीत ठेवल्या जातील. येत्या मार्च महिन्यापर्यंत भारताकडे स्वत:चा जाहिरात लायब्ररी अहवाल असेल. फेसबुकचे हे सर्व फीचर्स २७ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत.