औंदा हुरडा पार्टीवर संक्रांत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हिवाळा सुरु झाला की अनेकांची पावले आसपासच्या खेड्याकडे वळतात गुलाबी थंडीत शेकोट्यांसमोर बसून हुरडा पार्टीचे बेत रंगतात. विशेषतः शहरी लोकांसाठी हिवाळ्यात हुरडा पार्टी हा विकेंड चा प्लॅन ठरलेला असतो. तर खेडेगावातील लोकांच्या दृष्टीने एकत्र येऊन सहकुटुंब स्नेहभोजन म्हणजे हुरडा पार्टी. पण यंदाच्या दुष्काळाचा मोठ्या प्रमाणात परिणाम ज्वारी पिकावर झाल्याचे पाहायला मिळत आहे. ज्वारी पिकांची अवस्था पावसाअभावी खराब बनली असून यावर्षी तीस ते चाळीस टक्के पीकही हाती लागणार नाही. मात्र, यामुळे दरवर्षी रब्बी हंगामात शिवारात दिसणार्‍या हुरडा पार्ट्या यंदा दिसणार नाहीत. दुष्काळी परिस्थितीमुळे यावर्षी ही परिस्थिती ओढवली आहे.
यंदा पुरेसा पाऊसच न पडल्याने रब्बी हंगामातील पिकांची अक्षरशः वाताहत झाली आहे. त्यामुळे ज्वारी पिकांबरोबरच वैरणीचे पीकही यंदा फार कमी प्रमाणात निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे औंध, कुरोली, भोसरे, गोपूज, पळशी, खरशिंगे व अन्य गावांमध्ये मोठ्या प्रमाणात चाराटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. ज्वारीबरोबरच वैरणीचे दरही गगनाला भिडू लागले आहेत. नवी ज्वारी येण्याअगोदरच ज्वारीचे दर तीन ते साडे तीन हजार रुपये शेकड्याच्या घरात आताच गेले आहेत. त्यामुळे पुढे काय होईल हे सांगता येत नाही, अशी अवस्था निर्माण झाली आहे.
यंदा पाण्याअभावी पिके कुचमली आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार आहे. याचा परिणाम शेतकरी शेतामध्ये प्रतिवर्षी करीत असलेले पारंपरिक उत्सवही यंदा करु शकणार नाहीत. यंदा नातेवाईक, मित्रमंडळी शेतामधील हुरडा पार्टी तसेच परडी उत्सव, डावरा आदी कार्यक्रमांना मुकणार आहेत. काही ठिकाणी परंपरा मोडू नये म्हणून घरगुती पध्दतीने कार्यक्रम साजरे केले जात आहेत. यामुळे अशा कार्यक्रमांमुळे बहरणारी शिवारे मोकळी पडली आहेत. यामुळे विचारांची देवाणघेवाण, एकमेकांबद्दल असणारा जिव्हाळा तसेच शेतामध्ये बसून एकत्रित स्नेहभोजनाचा आनंद दुरापास्त होतो की काय ? अशी भीती वाटू लागली आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे बळीराजा आर्थिक संकटात असताना आता शेतामध्ये साजरे केल्या जाणार्‍या कार्यक्रमांच्या आनंदावरही विरझन पडणार आहे. खटाव तालुक्याच्या पूर्व भागात अनेक ठिकाणी पेरे न होऊनही परंपरा जपण्यासाठी शेतांमध्ये देवदेवतांचे पूजन करून औपचारिक पध्दतीने कार्यक्रम केले जात आहेत.