लष्करी व कामगार विमा रुग्णालयातील औषधांची विक्री करणाऱ्या मेडीकल्सवर एफडीएचे छापे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लष्करी रुग्णालये आणि कामगार विमा रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत दिल्या जाणा-या केंद्र शासनाच्या औषधांची विक्री खुल्या बाजारात करणाऱ्या चार घाऊक विक्रेत्यांवर एफडीएकडून छापे टाकण्यात आले. त्यांच्याकडून सव्वा तीन लाखांचा औषधांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

केंद्र शासनाच्या या औषधांची विक्री पुण्यातील मेडिकल्समध्ये होत असल्याची माहिती एफडीए ला मिळाली होती. त्यानुसार बुधवार आणि गुरूवार असे दोन दिवस हे छापे टाकण्यात आले आहेत. कोथरुड येथील चंदन फार्मास्यूटीकल्स, सदाशिव पेठेतील धनराज फार्मा. हडपसरमधील रॉयल फार्मा, वानवडीतील अशोक मेडीकल या औषधी विक्रेत्यांवर एफडीएने छापे टाकून औषधांचा साठा जप्त केला आहे. त्यांच्याकडून ८५ हजार रुपयांचा रक्तदाब (ब्लडप्रेशर) नियंत्रणात आणण्यासाठी उपयोगी असलेल्या ‘जानुविया टॅब्लेट’, २ लाख ४० हजार रूपयांचा मधुमेह (डायबेटिस) नियंत्रणात आण्यासाठी उपयुक्त असलेल्या गाल्वस टॅब्लेट’चा साठा जप्त करण्यात आला आहे. अशी महिती एफडीए पुणे विभागाचे सह आयुक्त एस. बी. पाटील यांनी दिली.

या सर्व प्रकरणात केंद्राच्या विभागातील अधिका-यांचा समावेश आहे का याचा शोध सूरू असून त्यांना नोटीस बजावण्यात येणार आहेत. त्यांच्या परवान्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.

ही कारवाई एफडीए चे (औषध विभाग) सह आयुक्त एस. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त अश्‍विन ठाकरे, राजेश चौधरी यांच्यासह औषध निरीक्षक अतिश सरकाळे, विवेक खेडकर, विलास तासखेडकर, सुहास सावंत आणि जयश्री चौधरी यांनी केली आहे.