क्राईम स्टोरी

बनावट पनीर बनवणाऱ्यांवर एफडीएची कारवाई

७०० किलो पनीरचा साठा नष्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (एफडीए) ठाण्यामध्ये मोठी कारवाई केली असून या कारवाईत तब्बल ७०० किलो बनावट पनीर जप्त करुन नष्ट करण्यात आले. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी पालघरमधील शुक्ला डेअरी आणि वसईमधील शिवकृपा डेअरीवर छापा टाकून बनावट पनीर नष्ट केले.

एफडीएने केलेल्या या कारवाई साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याठिकाणी सूर्यफूल तेल, ग्लिसरिल मोनो स्ट्रीट लिक्विड, दूध पावडरच्या साहाय्याने बनावट पनीर बनवले जात होते. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी शुक्ला डेअरीमध्ये छापा टाकून ८८ हजार ५०० रुपये किंमतीचे ३५४ किलो बनावट पनीर जप्त केले. तसेच १० हजार रुपये किंमतीचे ४० किलो स्कीम्ड मिल्क पावडर, ८ किलो ग्लिसरिल, मोनो स्ट्रीट लिक्विड असा एकूण ९९ हजार ५४० रुपयांचा साठा जप्त केला. पनीरचा साठा नष्ट करण्यात आला असून तीन नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

दुसरीकडे वसईच्या शिवकृपा डेअरीमधून ३५९ किलो बनावट पनीर जप्त करण्यात आले. या ठिकाणी केलेल्या कारवाईत ३ लाख ३२ हजार ५९९ रुपयांचा साठा जप्त करुन जप्त केलेले पनीर नष्ट करण्यात आले आहे. या कारवाईमुळे भेसळयुक्त पदार्थ तयार करणारे आणि त्याची विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या

Back to top button