वृद्ध आईचा सांभाळ करण्यास टाळाटाळ, मुलांच्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मुलांकडे म्हातरपणाची काठी ठरेल म्हणून वंशाचा दिवा असवा अशी इच्छा सर्वाची असते. मात्र हीच मुले म्हातरपणी आपल्या आई-वडिलांना योग्य वागणूक देत नाहीत. त्यांनी कमावलेल्या मालमत्तेवर आपला हक्क सागायला लागतात. त्याचे सर्वस्व हिरावून घेऊन त्यांची उतारवयात हालअपेष्टा करतात. त्यांची शारिरीक मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या कुचंबना करतात. सर्वस्व मुलांच्या स्वाधीन केल्यानंतर दैनंदिन गरजा भागवण्यासाठी मुलांसमोर हात पसरावे लागतात. नाहीतर कायद्याचे दरवाजे ठोठवावे लागतात. असाच एक प्रकार दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असून पोलिसांनी वृद्ध आईची देखभाल न करणाऱ्या मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मुलं सांभाळ करीत नाहीत. तसेच मानसिक व शारीरिक त्रास देतात म्हणून एका ९४ वर्षीय महिलेले मुलीच्या माध्यमातून थेट पोलिसांत तक्रार केली आहे. त्यानुसार दत्तवाडी पोलिसांनी सामाजिक बांधीलकी आणि शासनाच्या ज्येष्ठ नागरिक धोरणानुसार वृद्ध मातेला न्याय मिळावा म्हणून तिच्या दोन मुलांच्या कुटुंबावर गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित ज्येष्ठ महिला या दत्तवाडीतील लायन क्लब परिसरात रहायला आहे. त्यांना एक मुलगी आणि दोन मुले होती. मुलीची लग्न झाले असून मोठा मुलगा कोथरूड येथे राहतो तर छोट्या मुलाचे निधन झाले आहे. त्याची पत्नी व तीन मुली पीडित महिले बरोबर दत्तवाडीत राहतात.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २००७ साली त्या नातीला घेवून फिरण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी एका हातगाडीचा धक्का लागून त्या रस्त्यावर पडल्या. या अपघातात त्यांचा खुबा फ्रक्चर झाला होता. ऑपरेशन  झाल्याने त्या सर्व वैयक्तीक विधी जागेवरच करत. त्यामुळे सुन व नात या देखभाल न करता त्यांना शिवीगाळ करायच्या. तसेच त्यांना खायलाही वेळेवर न देता सारख्या ओरडत असत. कधीकधी अंगावर धावून येत व जीवे मारण्याच्या धमकी देत असत. या काळात मोठी नात व तिच्या पतीने घरातील इतरांच्या मदतीने त्यांना खोटी माहिती देत पीडितेच्या नावावर असलेले घर स्वत:च्या नावे बक्षिसपत्र करून त्यावर सह्या घेतल्या. त्यानंतर आता ते सर्व पीडित महिलेला घरात राहुन देत नाही. तसेच मानसिक व शारीरिक त्रास देतात. त्यामुळे त्या गेल्या १० महिन्यापासुन मुलीच्या घरी राहत आहेत. त्यामुळे त्यांची मुलगी आणि ज्येष्ठ नागरिक कक्षाने पोलिसांत तक्रार दिली आहे.

तक्रारीनुसार दत्तवाडी पोलिसांनी नातेवाईकांना बोलावुन वृद्ध आईला सांभाळण्यास सांगितले होते. मात्र कोणीही त्यांना सांभाळण्यास तयार नसल्याने पोलिसांनी सामाजिक बांधीलकी व शासनाच्या जेष्ठ नागरिक धोरणाला अनुसरुन वृद्ध मातेला न्याय मिळावा यासाठी दोन्ही मुलांच्या कुटुंबावर गुन्हा दाखल केला आहे.