‘त्या’ आई-वडिलांनी लेकीच्या लग्नातील पैसे दिले दुष्काळग्रस्तांना 

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – लग्न म्हटलं की वऱ्हाडी मंडळींना हार, तुरे, टोपी, शाल, श्रीफळ आणि डिजे असा अमाप खर्च केला जातो. परंतु एका कुटुंबाने आपल्या लेकीच्या लग्नाचा अतिरीक्त खर्च टाळत तो पैसा एका वृत्तपत्राच्या फंडाकडे देत दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात दिला आहे. आमटे परिवारातील इंजिनिअर झालेल्या लेकीचे लग्न शुक्रवारी (ता. 15) झाले. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी फंडाकडे पैसे दिल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले. विष्णू आमटे असं या मुलीच्या वडिलांचे नाव आहे.

मनीषा असं या वधूचं नाव आहे. अतिशय साध्या पद्धतीने मनिषाचं लग्न पार पडलं. या लग्नापूर्वी पाच हजार रुपयांचा धनादेश मीरा आमटे आणि विष्णू आमटे यांनी एका वृत्तपत्राच्या फंडाकडे सुपूर्द केला. आलेल्या पाहुण्यांचे शब्दसुमनांनी स्वागत करीत वधू-वरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. यानंतर अतिशय साध्या पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला. यावेळी सुरेश वाकडे, अभिजित देशमुख, सतीश वेताळ, रमशे आमटे, अशोक आमटे, बबन आमटे, चंद्रसेन घोडके, दिलीप गायकवाड, आशा गायकवाड यांची उपस्थिती होती.

दरम्यान, मनीषा ही मेकॅनिकल इंजिनिअर असून ती आमटे परिवारातील गिरणी कामगारांची मुलगी आहे. ते मूळचे खांडेपारगाव (ता. जि. बीड) येथील असून, सध्या हडको परिसरात राहत आहेत. तर मनिषाने ज्या मुलाशी विवाह केला तो मुलगा जातेगाव (ता. जामखेड, जि. नगर) येथील आहे. तोदेखील एमटेक आहे.

यानंतर मनिषाचा भाऊ हरीष आमटे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “कृषी क्षेत्रात काम करत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी माहित आहेत. या माध्यमातून अतिरिक्‍त खर्च टाळण्याचा प्रयत्न आहे. शेतकरी आणि दुष्काळग्रस्तांसाठी अनेक चांगले उपक्रम राबवले जात आहे याचा आनंद आहे.”