आता येणार स्मार्ट कार ; गाडीच्या दरवाजाला असणार फिंगरप्रिंट स्कॅनर 

लंडन : वृत्तसंस्था – स्मार्टफोन असो किंवा काॅम्प्युटर असो किंवा रोबोट असो या सर्वच क्षेत्रातील प्रगती दिवसेंदिवस वेगाने वाढताना दिसत आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजेन्समध्येही अनेक थक्क करणारे बदल लवकरच पाहायला मिळणार आहेत. मुख्य म्हणजे ऑटोमोबाईल क्षेत्रातही एक ताजा बदल झालेला पाहायला मिळत आहे. आपल्याला माहित आहेच की आता प्रत्येकच मोबाईलला फिंगरप्रिंट लाॅक आहे. आता मोबाईलप्रमाणेच मोटारीही नव्या फिंगरप्रिंट टेक्नॉलॉजीने युक्‍त असतील अशी माहिती समजत आहे. त्यामुळे आता गाडीची चावी हरवली वगैरे कटकटी दूर होतील ! कारण गाडीच्या चावी हरवल्याने अनेक लोकांना वैतागलेले आपण पाहिले असेल किंवा तुम्हीही हा अनुभव घेतला असेल.

आता लवकरच या स्मार्ट फिंगरप्रिंट टेक्नॉलॉजी कारच्या दरवाजाला लाॅक किंवा अनलाॅक करु शकेल. या टेक्नाॅलाॅजीचे विशेष म्हणजे फक्त लाॅक अनलाॅकच नाही तर हे तंत्र कार स्टार्टही करू शकणार आहे.

कसं असेल हे तंत्रज्ञान ?

जर तुमच्याकडे हे तंत्रज्ञान असणारी कार असेल तर कारच्या दरवाजाला अनलॉक करण्यासाठी चालकाला दरवाजाच्या हँडलवर लावलेल्या सेन्सरवर एक बोट ठेवावे लागेल. इन्क्रिप्टेड फिंगरप्रिंटच्या माहितीची पडताळणी झाल्यावर त्याची माहिती कारमधील फिंगरप्रिंट कंट्रोलरकडे पोहोचवली जाईल. सुरुवातीला ही सुविधा जगातील काही निवडक बाजारपेठांना डोळ्यांसमोर ठेवूनच दिली जाणार आहे. त्यानंतर हळूहळू जगभरात अशी सुविधा असलेल्या कार उपलब्ध होतील.

या तंत्रज्ञानाच्या अन्य सुविधा

हे तंत्रज्ञान चालकाला अन्यही काही ड्रायव्हिंग सुविधा देईल. त्यामध्ये सीट पोझिशन ऑटोमॅटिक अ‍ॅडजस्ट होणे, कारचे फीचर कनेक्ट करणे आणि चालकाच्या इच्छेनुसार साईड-व्ह्यू मिरर अँगल अ‍ॅडजस्ट करणे आदींचा समावेश आहे. स्मार्ट फिंगरप्रिंट टेक्नॉलॉजी असलेल्या कारच्या चालकाला इंजिन स्टार्ट करण्यासाठी केवळ इग्‍निशनला टच करावे लागेल. त्यासाठी चावी फिरवण्याची किंवा बटण दाबण्याची गरज नाही.