आता १ ली आणि २ री च्या विद्यार्थ्यांची गृहपाठापासून सुटका  

दिल्ली : वृत्तसंस्था – विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी कारण्याबरोबरच पहिली आणि दुसरीच्या  विद्यार्थ्यांना गृहपाठातून आता कायमची सुटका मिळणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने दप्‍तराचे ओझे, गृहपाठ आणि अभ्यासक्रम याबाबत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी मार्गदर्शिका जारी केली आहे.

विद्यार्थ्यांच्या दप्‍तराचे ओझे कमी करण्याची मागणी पालकांसह शैक्षणिक क्षेत्रातील विविध विभागांकडून करण्यात आली होती. यासंदर्भात दाखल याचिकेवर निकाल देताना मद्रास उच्च न्यायालयानेही काही महिन्यांपूर्वी विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्‍तराचे ओझे कमी करणे. तसेच, पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना घरचा अभ्यास (गृहपाठ) न देण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाचा हा निर्णय देशभरात चर्चेचा विषय बनला होता. त्यानंतर आता केंद्र सरकारने यासंदर्भात सूचना केल्या आहेत.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने यासंबंधी सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश दिले आहेत की, शाळांमध्ये विविध विषयांची शिकवणी आणि मुलांच्या दप्‍तरांचे वजन, याबाबत केंद्र सरकारने नियमावली तयार केली आहे. या नियमावलीची अंमलबजावणी करण्याची काळजी राज्य सरकारने घ्यायची आहे. या नियमावलीनुसार, पहिली आणि दुसरीच्या  विद्यार्थ्यांच्या दप्‍तराचे वजन हे दीड किलोपेक्षा अधिक असायला नको. तसेच तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या दप्‍तराचे वजन हे 2 ते 3 किलो ,सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांच्या दप्‍तराचे ओझे 4 किलो,आठवी-नववीच्या विद्यार्थ्यांच्या दप्‍तराचे ओझे साडेचार किलो आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दप्‍तराचे वजन 5 किलो असायला हवे.

राजू शेट्टी यांच्या विरोधात ‘या’ व्यक्तीने केली आपली उमेदवारी जाहीर  

असे दिले आहे निर्देश 

पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्यात येऊ नये. पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांवर भाषा आणि गणित विषयाखेरीज अन्य अभ्यासक्रम लादू नये. तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण आणि गणित हे विषय असावेत. राष्ट्रीय शिक्षण, संशोधन, प्रशिक्षण परिषदेने (एनसीआरटीई) निर्धारित केलेल्या अभ्यासक्रमाचीच अंमलबजावणी करावी, असेही या नियमावलीत म्हटले आहे. विद्यार्थ्यांना अतिरिक्‍त पुस्तके, जादा साहित्य आणण्यास भाग पाडू नये, असे निर्देशही केंद्राने दिले आहेत.