मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघातात ५ जण ठार 

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर खंडाळा बोर घाटातील आडोशी बोगद्याजवळ झालेल्या भीषण अपघातात ५ जण ठार झाले असून २ जण गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्याहून मुंबईच्या दिशेने सिमेंट बॅगा घेऊन जाणारा ट्रक हा आडोशी बोगदा पार करुन जात असताना समोरील वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक मुंबई लेनवरुन पुण्याकडे येणाऱ्या लेनवर पलटी झाला. यावेळी पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या तीन कार या ट्रकखाली दबल्या गेल्या. त्यामधील चार जणांचा जागीच तर एक जणाचा उपचाराकरिता घेऊन जात असताना मृत्यु झाला. मृत्यांमध्ये तीन महिला व दोन पुरुषांचा समावेश असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातानंतर ट्रकमधील सिमेंट रस्त्यावर सर्वत्र पसरल्याने पुण्याकडे येणारी वाहतुक ठप्प झाली असून लांबच लांब वाहनांचा रांगा लागल्या आहेत. घटनेची माहिती समजताच खोपोली व बोरघाट पोलीस, आयआरबी व डेल्टा फोर्सचे कर्मचारी, देवदूत पथक व  अपघातग्रस्तांच्या मदतीला  सामजिक संस्थेचे कार्यकर्ते, घटनास्थळाकडे धाव घेत मयत व जखमींना वाहनांमधून बाहेर काढत उपचाराकरिता रवाना केले. अपघातग्रस्त वाहने व रस्त्यावर पसरलेले सिमेंट बाजूला करण्याचे काम सुरु आहे.