राजकीय

पाच राज्यांच्या निवडणुकींचा निकाल कलाटणी देणारा असेल : तटकरे

दापोली : पोलीसनामा ऑनलाइन – पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल राजकारणाला वेगळी कलाटणी देऊन जाणारा असेल, असे भाकित राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी केले आहे. तटकरे म्हणाले, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, मिझोराम, तेलंगाणा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका सध्या शेवटच्या टप्प्यात असून ११ डिसेंबर रोजी या राज्यांची मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहेत. २०१४ मध्ये देशामध्ये मोदींची लाट होती. तिचा प्रभाव पुढील दोन वर्षे टिकला. त्यानंतर त्याला उतरती कळा लागली.

पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांच्या दापोली दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर आ. तटकरे दापोलीत आले असताना त्यांनी पत्रकारांजवळ संवाद साधला. तटकरे म्हणाले, देशामध्ये विविध राज्यात झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजप सातत्याने पराभूत झाली आहे. आता काही राज्यांमध्ये आलेली भाजपची सत्ता ही मतदारांची अपरिहार्यता होती. सध्या सुुरू असलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपाला पर्याय म्हणून अन्य पक्ष उभे असून या निवडणुकीच्या निकालानंतर देशाचे राजकारण निश्चितच बदलणार आहे. शिवसेनेला गेल्या चार वर्षात दुय्यम दर्जाची वागणूक भाजपने दिली आहे. मागील निवडणुकीत स्वतंत्र लढूनही भाजपला १२३ व मित्रपक्ष आणि अपक्ष आमदार असे सुमारे १३०-३२ जागांवर विजय मिळवता आला होता. जर युती करायची असे ठरले तर भाजप शिवसेनेला दुय्यम स्थान देईल व शिवसेना ते खपवून घेईल, असे वाटत नाही. नोटबंदी, पेट्रोल भाववाढ, जीएसटी अशा विविध मुद्द्यांवर भाजप अपयशी ठरली आहे.

रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीने लढवावा, अशी इच्छा काँग्रेसच्याच नेत्यांनी व्यक्त केली होती. आपण जागा वाटपाच्या चर्चेवेळी या प्रस्तावावर कोणतीहि भूमिका व्यक्त केली नव्हती. मात्र, यामागे माझे व नारायण राणे यांचे मैत्रीचे संबंध कारणीभूत असल्याचे गृहीत धरुन काँग्रेसचे नेते आपल्यावर टीका करत आहेत ते चुकीचे असल्याचे मत आ. सुनील तटकरे यांनी दापोलीत व्यक्त केले.

ते म्हणाले की, राज्यातील विविध लोकसभा मतदारसंघनिहाय जागा वाटपाची चर्चा सुरू असताना कोणता मतदारसंघ कोणी लढवावा, याची चाचपणी चालू होती. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी रत्नागिरी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्याकडे सक्षम पर्याय नसल्याने राष्ट्रवादीने तो लढवावा असे सुचविले. आपण त्यावर काही बोललो नाही. कारण राष्ट्रवादीचीही या मतदारसंघात मर्यादित ताकद आहे. मात्र, आपल्याला टार्गेट करून काँग्रेसचे नेते कार्यकत्र्यांमध्ये संभ्रम निर्माण करत असून, माझी व नारायण राणे यांची मैत्री आहे. तशीच मैत्री राज्यातील विविध पक्षांच्या नेत्यांजवळ आहे. त्यामुळे त्याचा गैरअर्थ काढणे चुकीचे आहे. पवारसाहेब आपल्या कोकण दौऱ्यात नारायण राणे यांच्याकडे गेले म्हणजे त्यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिला, असे होत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published.

2 + six =

Back to top button