लोणावळ्यात पर्यटकांना व्यापाऱ्यांकडून बेदम मारहाण

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाईन – लोणावळ्यात व्यापारी व स्थानिकांनी पर्यटकांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना  घडली. टायगर पॉईंटवर काल संध्याकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. उंटाची सवारी केल्यानंतर पैसे घेण्यावरून हा वाद झाला. यामध्ये गुजरातमधील कुटुंबातले पाच जण जखमी झाले असून या प्रकरणी इबाद अब्दुल सत्तार मेमन (५२, रा. वडोदरा, गुजरात) यांनी तक्रार दिली आहे.

मकरसंक्रातीच्या सुट्टीनिमित्त वडोदरा येथील मेमन कुटुंबीयांपैकी २५ जण लोणावळ्यात आले होते. ते सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास लोणावळ्यातील ‘टायगर पॉइंट’वर फिरण्यासाठी गेले. त्यांच्यासोबत असलेल्या लहान मुलांनी उंटाची सवारी केली. उंटाची सवारी झाल्यानंतर मात्र उंट व्यापाऱ्याने ठरल्यापेक्षा अधिक पैसे सांगितले आणि यावरून वाद सुरु झाला.

या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यातच एका व्यापाऱ्याने असिफ मोतीवाला यांच्यात डोक्यात काचेची बाटली फोडली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर मेमन कुटुंबाला व्यापाऱ्यासह स्थानिक नागरिकांनी पाईप, काठी आणि काचेच्या बाटल्यांनी मारहाण केली. तसेच मेमन कुटुंबीयांची गाडीही रोखली. त्यानंतर मेमन कुटुंबीयांनी स्थानिकांना तीन हजार रुपये दिल्यानंतर त्यांची गाडी सोडण्यात आली. या झटापटीत एक मनगटी घड्याळ आणि एका महिलेची पर्स हिसकविण्यात आली आहे. या पर्समध्ये हिऱ्याची कानातील रिंग व दागिने असा सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज होता. या वादात आसिफ मोतीवाला, अहमद मेमन, सुफीयान मेमन, रईसा मेमन आणि नसर मेमन हे पाच पर्यटक जखमी झाले असून दरम्यान, जखमींना उपचारासाठी लोणावळा येथील परमार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मात्र अद्याप मारहाण केलेल्या व्यक्तींची नावे समजू शकलेली नाहीत. या प्रकरणाचा अधिक तपास लोणावळा ग्रामीण पोलिस करत आहेत.