लग्नाच्या बेडीत अडकण्यापूर्वीच अडकला पोलिसांच्या बेडीत

वसई : पोलीसनामा ऑनलाईन – लग्नाच्या आदल्या रात्री चोरी करणे एका चोरट्याला महागात पडले. त्यामुळे लग्नाच्या बेडीत अडकण्यापूर्वीच चोरटा पोलिसांच्या बेडीत अडकला. लग्न पत्रिका वाटण्यासाठी वसईत आलेल्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली.

फिरोज अन्सारी (रा. भिवंडी) असे या चोरट्याचे नाव आहे. फिरोज हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. रविवारी त्याचे लग्न होते. बहिणीला लग्नपत्रिका देण्यासाठी तो वसईमध्ये आला होता. बहिणीला लग्नपत्रिका दिल्यानंतर मित्रांना आणि इतर नातेवाईकांना पत्रिका देण्यासाठी तो वालीव परिसरात आला होता.

शनिवारी जाता जाता पुन्हा एक मोबाईल चोरण्याचा प्रयत्न त्याने केला. रस्त्यावरून जाणारा एक इसम मोबाईलवर बोलण्यात गुंग होता. त्याला धक्का मारून त्याच्या हातातील मोबाईल घेऊन पळ काढला. त्यानंतर या इसमाने मदतीसाठी आरडाओरड केला. लोकांनी पाठलाग करून फिरोजला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. मोबाईल लंपास करण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला आणि त्याला तुरुंगात जाव लागलं.