बिल मिळाले नाही तर आता रेल्वेत जेवण फुकट

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन  – कोणत्याही रेस्ट्रारंटमध्ये गेला. नास्ता, जेवण केले की वेटर बिल आणून देतो आणि आपण ते पेड करतो. रेल्वेत मात्र काहीही घेतले तरी बिल काही मिळत नाही आणि मेनू कार्ड तर नसते. पण आता मार्चपासून तसे होणार नाही. तुम्हाला मेनू कार्डही दिसेल आणि बिलही मिळणार आहे. बिल मिळाले नाही तर त्याचे पैसे देण्याची गरज नाही. ते जेवण फुकट असल्याचे समजावे. खरं वाटत नाही ना. पण रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ही घोषणा केली आहे.

येत्या मार्च महिन्यापासून रेल्वेमधील जेवणाच्या किंमतींचे तक्ते रेल्वेसह स्टेशनवर सर्वांना दिसेल अशा ठिकाणी लावले जाणार आहे. विशेष म्हणजे या तक्तावर एक संदेश लिहिला जाणार आहे. ‘कृपया टिप देऊ नका, जर बिल मिळाले नाही तर तुमचे जेवण मोफत आहे’. रेल्वेमधील कॅटरिंग सेवा पारदर्शी बनवण्यासाठी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी हे पाऊल उचलले आहे.

३१ मार्च २०१९ पर्यंत सर्व कॅटरिंग स्टाफ आणि टीटीई यांना स्वाईप मशीन तसेच पीओएस (पॉईंट ऑफ सेल) मशीन्स वितरीत केल्या जाणार आहेत. रेल्वे प्रशासन प्रवाशांना ज्या सुविधा देत आहे, त्यांच्या किमंती सार्वजनिक केल्या जाणार आहेत.

पियुष गोयल आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची गुरुवारी महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत गोयल यांनी काही महत्त्वाचे आदेश दिले आहेत. प्रवाशांच्या सुविधांबाबतच्या तक्रारींसाठी रेल्वे प्रशासनातर्फे एक हेल्पलाईन नंबर सुरु केला जाणार आहे. सध्या देशभरातील ७२३ रेल्वे स्थानकांवर मोफत वायफायची सेवा दिली जाते. येत्या काळात दोन हजार रेल्वे स्थानकांवर मोफत वायफायची व्यवस्था करण्यात येईल.