इतिहासात पहिल्यांदाच आटपाडी तालुका ‘रब्बी’पासून वंचित

सांगली | पोलीसनामा आॅनलाइन  – आटपाडी तालुक्याच्या इतिहासात यंदा प्रथमच रब्बीची पेरणी झाली नाही. खरिपाचा पेरा वाया गेला आहे. त्यानंतर रब्बीची पेरणी झाली नाही. पावसाने नेहमीप्रमाणे दगा दिला. त्यामुळे आटपाडी तालुक्यावरचे दुष्काळाचे सावट आणखी गडद झाले आहे. आटपाडी तालुक्यात वार्षिक सरासरी 355 मिलिमीटर पाऊस पडतो. यावर्षी सरासरी फक्त 80 मिलिमीटर पाऊस पडला आहे. तो पाऊसही सलग न पडल्याने त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. खरिपाच्या हंगामात 15 हजार हेक्टरवर पेरणी झाली. पण ती पूर्ण वाया गेली. तालुक्यातील  60 पैकी 13 गावांमधून टँकरची मागणी झाली आहे. ही मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आटपाडी, राजेवाडी,  उंंबरगाव, पुजारवाडी (दिघंची), बोंबेवाडी, आंबेवाडी, लेंगरेवाडी, पिंपरी खुर्द, तडवळे, दिघंची, विभुतवाडी या गावांत आणि आसपासच्या वाड्यावस्त्यांवर पाण्याची तीव्र टंचाई भासते आहे. या गावांनी टँकरसाठी महिन्यापूर्वी मागणी केली आहे. परंतु अद्याप एकही टँकर सुरू झालेला नाही.

८५ लाख शेतकऱ्यांना दुष्काळाचे चटके, सर्वाधिक झळ मराठवाड्याला 

टँकरची खरंच गरज आहे का, याची तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी पाहणी करुन अहवाल दिला आहे. मात्र अद्याप त्यावर अंमलबजावणी झालेली नाही. गेल्यावर्षी चांगला पाऊस झाला आणि टेंभूचे पाणी काही प्रमाणात मिळाले. त्यामुळे ऊस आणि अन्य पिकांची लागवड झाली. दूध उत्पादन वाढले. पण यंदा दुष्काळाचे जुने दुखणे पुन्हा उद्भवल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दुधाचे दैनंदिन उत्पादन एक लाख लिटरवरुन 75 हजार लिटरवर येऊन ठेपले आहे. डाळिंबाच्या बागांमध्ये गेल्या काही वर्षात मोठी वाढ झाली आहे. दुष्काळाच्या संकटावर मात करत कष्टाने जोपासलेल्या डाळिंबाच्या बागा संकटात सापडल्या आहेत. तालुक्यातील बहुसंख्य बागा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये बहरत असतात. या हातातोंडाशी आलेल्या बागा वाया जाण्याची चिन्हे आहेत.”

टँकरच्या पाण्याने या बागा वाचविण्याची केविलवाणी धडपड सुरू आहे. अर्थात तालुक्यात टेंभूचे पाणी आल्याने दुष्काळाची  तीव्रता कमी जाणवत आहे. पण मोजक्याच तलावात पाणी आले आहे. अन्य तलाव कोरडे आहेत. विहिरींमधील पाण्याने तळ गाठला आहे. टेंभूच्या पाण्याने तालुक्यातील सर्व तलाव भरुन घेतल्यास दुष्काळाची तीव्रता निश्‍चितपणे कमी होईल. ज्या तलावांमध्ये टेंभूचे पाणी जात नाही तिथे शासकीय पातळीवर वेगळी यंत्रणा उभी करुन ते तलाव भरुन देण्याची गरज आहे. शासनाने आटपाडी तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. या घोषणेला पंधरवडा उलटला तरी कोणतीही उपाययोजना झालेली दिसत नाही. चारा नाही, पाणी नाही, रोजगार हमीची कामे सुरू नाहीत. त्यामुळे दुष्काळाचे संकट गहिरे होत आहे.

टेंभू योजनेचे पाणी विनाअट सोडा

टेंभूचे पाणी शेतकर्‍यांनी पैसे भरले तरच सोडले जाते. पैसे गोळा करणे आणि ते भरणे यात वेळ वाया जात आहे. पैसे गोळा करुन ते भरण्याची यंत्रणा गतिमान करण्याची गरज आहे.जिल्हाधिकार्‍यांनी  टँकर आणि चारा छावण्यांवर होणारा खर्च टाळण्यासाठी  प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.

चार्‍याच्या नियोजनाची गरज
तालुक्यात चार्‍याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. पाऊस नसल्याने हिरवा चारा तर नाहीच पण कडबादेखील मिळणे मुश्किल झाले आहे. वैरणीचे दर गगनाला भिडले आहेत. जनावरांना चारण्यासाठी कोठे न्यायचे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यासाठी थेट अनुदान किंवा चारा पुरवठा करण्याचे नियोजन केले पाहिजे.