एचसीएमटीआर मार्गासाठी १० दिवसात एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट मागविणार : सौरभ राव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील सुमारे ३४ कि.मी. च्या हाय कपॅसिटी मास ट्रान्झीट रुटला (एचसीएमटीआर)  तत्वत: मान्यता मिळावी यासाठी राज्य शासनाला बुधवारी पत्र पाठविण्यात आले आहे. या मार्गीकेच्या विकसनासाठी भूसंपादन करण्यासाठी बॉन्ड रिझर्व्हेशन तसेच मेट्रो प्रमाणेच मार्गीकेच्या ५०० मी. परिसरात चार चटई निर्देशांक बांधकामाला परवानगी मिळावी यासाठीच्या टीओडी पॉलिसीला मान्यता मिळावी असा प्रस्तावही शहर सुधारणा समिती पुढे ठेवला असून दहा दिवसांत एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट मागविण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली.

सौरभ राव यांनी सांगितले, की मागील आठवड्यात राष्ट्रीय महामार्ग अधिकार्‍यांसोबत झालेल्या बैठकीनंतर एचसीएमटीआर मार्गीकेच्या कामाचा सूक्ष्म आराखडा तयार करण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने मार्गीका उभारण्यासाठीचे भूसंपादन, मार्गीकेच्या प्रत्यक्षात उभारणीसाठी येणारा खर्च या दोन गोष्टींचा प्रामुख्याने विचार सुरू आहे. यासाठी राज्य शासनाची तात्विक मान्यता मिळावी यासाठी बुधवारी राज्य शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी सहा हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च आहे. भूसंपादन करण्यासाठी बॉन्ड रिझर्व्हेशनचा पर्याय ठेवण्यात आला आहे, तसेच मार्गीकेच्या उभारणीसाठी पीपीपी, कर्जरोखे, बँकांकडून कर्ज आदी पर्यायांवर विचार सुरू आहे. तसेच जाहिरातींचे हक्के, या मार्गीकेवरील २७ रॅम्पखालील जागा व्यावसाकिय वापरासाठी भाडेकराराने देणे हे उत्पन्नाचे पर्याय ठेवण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने मेट्रो मार्गीकेप्रमाणे मार्गीकेच्या दोन्ही बाजूला ५०० मी. परिसरात चार एफएसआय देण्यासाठी टीओडी पॉलिसी राबविण्यात येणार आहे. बांधकाम प्रिमियममधून मिळणार्‍या उत्पन्नाचा लाभही मार्गीका उभारणीसाठी होणार आहे. यासाठी टीओडी पॉलिसीचा प्रस्ताव मान्यतेसाठी शहर सुधारणा समितीपुढे ठेवला आहे.

या मार्गिकेचा सूक्ष्म अभ्यास करण्यात येत आहे. संपुर्ण प्रकल्पीय आराखडा तयार करण्यासाठी येत्या दहा दिवसांत  एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट मागविण्यात येतील. हा आराखडा तयार झाल्यानंतर ही मार्गीका उभारण्यासाठीची पुढील दिशा निश्‍चित होईल, असेही राव यांनी यावेळी नमूद केले. याप्रसंगी महापौर मुक्ता टिळक उपस्थित होत्या.