पंतप्रधानांना पुलवामापेक्षा जाहीरसभा महत्वाची : शरद पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कितीही भावूक होऊन अश्रु ढाळले तरी पुलवामा येथील दहशतवाद्यांच्या हल्ल्यापेक्षा त्यांना जाहीर सभेत पक्षाचा प्रचार करणे अधिक महत्वाचे वाटत असल्याची टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. या घटनेनंतर काँग्रेस पक्षासह सर्व विरोधकांनी आपले कार्यक्रम रद्द करुन सरकार व जवानांच्या पाठीशी असल्याचे सांगितले होते. मात्र, पंतप्रधान व भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या जाहीर सभा सुरु ठेवल्या होत्या. संपूर्ण देश शोकामध्ये बुडाला असताना पंतप्रधानांनी जाहीर सभा घेण्यावर टिका झाली तरी देशभरातील वातावरण पाहून कोणत्याही राजकीय पक्षाने पंतप्रधानांवर टिका केली नव्हती. या जाहीर सभेत पंतप्रधान अतिशय भावुक झाल्याचे दाखवत होते. त्यावरही सोशल मिडियावरुनही जोरदार टिका झाली होती. अनेकांनी त्यांची खिल्ली उडविली होती. या बैठकीतील भाजप व पंतप्रधानांच्या अनुपस्थितीविषयी जाहीरपणे सांगत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

हेही वाचा – उत्तर भारताला भूकंपाचा धक्का 

याबाबत पवार यांनी सांगितले की, पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधानांनी तात्काळ सर्वपक्षीय बैठक बोलावली. मात्र, मी ज्यावेळी बैठकीला पोहोचलो, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीला हजर नव्हते. भाजपचा प्रतिनिधीही उपस्थित नव्हते. ते धुळे, यवतमाळ या ठिकाणी जाहीर सभेला गेले होते.इतक्या महत्वाच्या विषयावर बैठक बोलावली असताना पंतप्रधानांना बैठकीपेक्षा धुळे, यवतमाळला जाणे अधिक महत्वाचे वाटते. भाजपचेही कोणीही प्रतिनिधी उपस्थित नव्हते. आता ते म्हणतील की राजनाथसिंह होते. पण राजनाथसिंह हे गृहमंत्री या नात्याने बैठकीला उपस्थित होते.

सर्व विरोधकांनी सरकार आणि जवानांच्या पाठीशी असल्याचे ठामपणे सांगितले असताना सत्ताधारी पक्ष म्हणून भाजप आणि पंतप्रधानांनी पुलवामा हा विषय किती गांभीर्याने घेतला, हे दिसून आले. हा खरा चिंतेचा विषय आहे, असे म्हणत त्यांनी मोदींवर निशाणा साधला.