भारतीय संघाच्या माजी गोलंदाजावर जीवघेणा हल्ला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचे माजी गोलंदाज आणि दिल्लीच्या निवड समितीचे अध्यक्ष अमित भंडारी यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. हॉकी स्टिक, सायकलची चेन यांसारख्या गोष्टी घेऊन आलेल्या सुमारे १५ गुंडांनी त्यांना मारहाण केली. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला आणि कानाला दुखापत झाली असून त्यांचे सहकारी सुखविंदर सिंग यांनी त्यांना संत परमानंद रुग्णालयात दाखल केले.या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत गुंडानी तेथून पळ काढला.

या घटनेबाबत अंडर २३ चे व्यवस्थापक शंकर सैनी म्हणाले, ‘मी तंबूत जेवत होतो. भंडारी आणि अन्य एक निवड सदस्य व सिनिअर टीमचे कोच मिथुन मन्हास ट्रायल मॅच पहात होते. दोन लोक आले आणि भंडारी यांच्याजवळ गेले. त्यांची भंडारींसोबत शाब्दिक चकमक झडली. ते निघून गेले. त्यानंतर १५ जण हॉकी स्टीक्स, लोखंडी सळया, सायकलच्या साखळ्या घेऊन आले. चाचणीत सहभागी झालेली मुले आणि आम्ही भंडारींना वाचवायला धावलो. पण आम्हाला धमकावले की मध्ये पडल्यास गोळी मारू. त्यांनी नंतर भंडारींना हॉकी स्टीक आणि लोखंडी सळ्यांनी मारलं.’

या घटनेनंतर दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघ (डीडीसीए) अध्यक्ष रजत शर्मा म्हणाले, ‘घडलेल्या प्रकाराची माहिती आम्ही घेत आहोत. राष्ट्रीय अंडर-२३ स्पर्धेसाठीच्या संभाव्य खेळाडूंमध्ये या खेळाडूचं नाव नव्हतं. टीममध्ये निवड न झाल्यामुळे एका खेळाडूनं हे कृत्य केल्याची माहिती आमच्याकडे आहे. ज्यांनी कोणी हे कृत्य केलं आहे त्यांच्यावर कारवाई होईल. तसंच आम्ही एफआयआर दाखल करू.’

अमित भंडारी भारताकडून २ वनडे मॅच खेळले आहेत. तसंच त्यांनी ९५ प्रथम श्रेणी आणि १०५ मॅच खेळल्या आहेत.