‘तो’ डोस देताच दगावले ४ महिन्यांचे बाळ, आई-वडिलांनी फोडला टाहो

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – नियमित डोस पाजल्यानंतर ४ महिन्यांच्या बाळाची प्रकृती खालावून आठ तासांत त्याचा मृत्यू झाल्याची घटना अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयात समोर आली आहे. सदर बाळाचे शवविच्छेदन करण्यात आले असून शवविच्छेदन अहवालानंतरच बाळाच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकणार आहे.

अहमदपूर तालुक्यातील चिलखा येथील रहिवासी संध्याराणी ज्ञानेश्वर शिंदे या चार महिन्यांच्या मुलीला डोस देण्यासाठी अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले होते. यावेळी संध्यराणीला ‘पेन्टा-३’ हा डोस देण्यात आला. हा तिचा नियमित दिला जाणारा तिसरा डोस होता. डोस दिल्यानंतर तोंडावाटे पोलिओ पाजण्यात आला. दोन तासांनंतर बाळाला अस्वस्थ वाटू लागले आणि तोंडावाटे फेस आणि नाकामधून रक्त येण्यास सुरुवात झाली. घाबरलेल्या पालकांनी बाळाला तातडीने रुग्णालयात आणले, परंतु डॉक्टरांनी तिला लातूरला घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे बाळाला लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपचार सुरू असताना रात्री ११ वाजेच्या सुमारास बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेनंतर शवविच्छेदन करण्यात आले असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच बाळाच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे डॉक्टरांच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, अत्यंत गुटगुटीत असलेल्या बाळाचा मृत्यू केवळ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला असून संबंधित कर्मचारी, डॉक्टर यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बाळाचे वडील ज्ञानेश्वर शिंदे यांनी केली आहे. यासंदर्भात उशिरापर्यंत पोलिसांत नोंद करण्यात आलेली नव्हती.

…म्हणून मुलाच्या मदतीने ‘तिने’ काढला पतीचा काटा