सावधान ! शहिदांना मदत करण्याच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक 

श्रीनगर : वृत्तसंस्था – पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झाले. या शहिदांच्या कुटुंबियांच्या मदतीला अनेक लोक पुढे आले आहेत. परंतु या गोष्टीचा फायदा काही समाजकंटकांनी घ्यायला सुरुवात केली आहे. शहिदांना मदत करणाऱ्या लोकांची आर्थिक फसवणूक करून पैसे हडप करण्याचा प्रयत्न होत असल्याची धक्कादायक माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

राजनाथ सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही समाजकंटक मदत करणाऱ्या लोकांची आर्थिक फसवणूक करत आहेत. मदत करणाऱ्या लोकांच्या भावनांशी खेळ केला जात आहे. या भामट्यांनी काही खोटी संकेतस्थळं सुरु केली आहे. या संकेतस्थळांच्या लिंक्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

वेबसाईटवर मदत करा
पुलवामा हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबीयांना सरकारसह अनेक लोक आर्थिक मदत करत आहेत. शहीदांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी अनेक संस्था, लोकांकडून आवाहन केले जात आहे. परंतु, काही भामटे लोकांच्या भावनांशी खेळ करत आहेत. लोकांचा मदतनिधी वेगळ्या मार्गाने जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सरकारच्या  https://bharatkeveer.gov.in/  (भारत के वीर)या वेबसाईटवरच मदत करण्याचे आवाहन केंद्रीय गृहमंत्रालयाकडून करण्यात आले आहे.

जवानांच्या मृतदेहांचे फोटो शेअर करू नका
दरम्यान काही समाजकंटक समाजात द्वेष पसरविण्यासाठी जवानांच्या मृतदेहांचे खोटे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. असे फोटो कृपया कुणी शेअर करू नका. तसेच असे फोटोंची व फोटो शेअर करणाऱ्यांची माहिती [email protected] या इमेलवर द्या’ असे आवाहन सीआरपीएफने केले आहे.