बापाकडून चिमुकलीचे पाच वर्षे लैंगिक शोषण, शेजाऱ्यांमुळे प्रकार उघडकीस 

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – जन्म दिल्यानंतर आईने दुसरीकडे घरठाव केला आणि दारुड्या बापाने दररोज मारहाण करून पोटच्या मुलीचे लैंगिक शोषण केले. गेल्या ५ वर्षांपासून सुरू असलेल्या बापाच्या अत्याचाराने त्रस्त झालेल्या मुलीने पोलिसांसमोर तोंड उघडले, आरोपी बाप हा गवंडी काम करतो. त्याला एक १२ वर्षांचा मुलगा आणि १४ वर्षांची मुलगी आहे. बापाच्या दररोजच्या दारू पिऊन मारहाणीला त्रासून बायकोने दुसरीकडे जाऊन संसार थाटला.

अशा परिस्थितीत आईच्या मायेपासून दुरावलेली दोन्ही मुले दिवसभर घरीच राहत आणि शेजाऱ्यांच्या मुलांसोबत खेळत असे. पण, वासनेने पिसाटला बापाला स्वत:ची मुलगीही कमी पडली. दररोज दारू ढोेसून आल्यानंतर तो तिला मारहाण करायचा आणि तिच्यावर बलात्कार करायचा. सदर प्रकार २४ फेब्रुवारी २०१२ ते १७ डिसेंबर २०१८ पर्यंत म्हणजे ५ वर्षांपासून सुरू होता. ती मुलगी ९ वर्षांची असताना बापाने तिला आपल्या वासनेची शिकार बनविले.

कामावरून बाप घरी आल्यानंतर शेजाऱ्यांना दररोज मुलीच्या रडण्याचा आवाज यायचा. काम करीत नसल्यामुळे कदाचित बाप तिला मारत असावा, असा संशय शेजाऱ्यांना होता. त्यामुळे त्यांनीही तिला कधी विचारपूस केली नाही. नेहमीप्रमाणे गुरुवारी बाप कामावरून परत आला आणि त्याने मुलाला एका खोलीत कोंडून मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केला असता त्याने तिला पट्ट्याने मारहाण केली. रात्री १० वाजताचा हा सर्व प्रकार शेजाऱ्यांच्या कानावर पडल्याने त्यांनी वाडी पोलिसांना फोन केला. पोलीस तत्काळ घटनास्थळी आले आणि त्यांनी आरोपीच्या घराचे दार ठोठावले. पोलीस पाहून त्याचे अवसान गळाले, पण पीडित मुलगी धावत घराबाहेर आली आणि पोलिसांना बिलगली. पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन विचारले असता, तिने बापाच्या अत्याचाराचा पाढा वाचला. पोलिसांनी फिर्यादी मुलीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी बापाविरुद्ध कलम ३७६ (२) (एन), ३७६ (एन) (आय) (जे), ३२३, ३२४, ५०६ भादंवि सहकलम ४, ८, १२ पोक्सो ॲक्ट अन्वये गुन्हा नोंदवून अटक केली आहे.