चोरीच्या १९ दुचाकींसह टोळी जेरबंद

नाशिक : पोलीसनामा आॅनलाईन – दुचाकी चोरी प्रकरणी दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत मालेगाव पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. तसेच शहर परिसरातून चोरीला गेलेल्या १९ मोटारसायकली त्यांच्याकडून जप्त केल्या आहेत. या आरोपींना न्यायालयासमोर हजर केली असता त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक अजित हगवणे, रत्नाकर नवले, पोलीस निरिक्षक पी. जी. पठारे यांनी किल्ला पोलीस ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

किल्ला पोलिसांनी केलेल्या पहिल्या कारवाईत अतहर समसुद्दोहा अन्सारी, खालीद अख्तर निहाल अहमद (दोघे रा. नयापुरा, मालेगाव) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एमएच १५ सीडब्ल्यू ५१९७ ही मोटारसायकल पोलीस निरिक्षक पठारे व पोलीस नाईक किशोर नेरकर यांनी गुप्त माहितीद्वारे अजमल खा चौक येथे पकडली. त्यांची चौकशी केली असता त्यांनी दिलेल्या माहितीवरून सोळा मोटारसायकल जप्त करण्यात आल्या. मोटारसायकल चोरून स्थानिक एका गॅरेजमध्ये चेसीज नंबर खोडून नूतनीकरण केल्यानंतर अवघ्या पाच ते सहा हजारांमध्ये या मोटारसायकल विकण्यात येत होत्या.

संशयितांनी विक्री केलेल्या सर्व मोटारसायकल पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहे. या प्रकरणातील मोहमंद मुस्लीम हा गॅरेजचालक फरार असून त्याचा शोध सुरू आहे. मोटारसायकल चोरी हे सत्र दोन वर्षांपासून सुरू असून संशयितांकडे आणखी मोटारसायकल मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे चोरीच्या मोटारसायकल विकत घेणाऱ्यांचे तसेच नंबर प्लेट बदलून विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. लवकरच शहर पोलीस दलातर्फे सर्वच वाहनांची तपासणी करण्यात येणार असून कागदपत्रे नसणाऱ्यांवर जरब बसेल अशी कारवाई करणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी यावेळी सांगीतले.

दुसऱ्या कारवाईत छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकनाथ मन्साराम अहिरे (रा. कुकाणे, ता. मालेगाव), पुरुषोत्तम लक्ष्मण डांगचे (रा. साने गुरुजीनगर), मुकेश घनश्याम वराडे (रा. मधुबन कॉलनी), शुभम संजय शिंदे (रा. द्याने) या चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून तीन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहे. या आरोपींकडून अजून काही मोटारसायकल जप्त होणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.