मंदीरामध्ये चोरी करणारी अट्टल गुन्हेगारांची टोळी गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ग्रामीण भागात मंदीरामध्ये घरफोडी करुन लाखोंचा मुद्देमाल चोरुन नेणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. या टोळीने २८ ऑक्टोबर रोजी केळावडे येथील दत्तमंदीरात चोरी करुन परिसरात ७ ठिकाणी चोरी केली होती. अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी एकावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवारी (दि.१) घोटावडे चौकात करण्यात आली.

राम धारा बिरावत (वय ३१ रा.कुरमोळी ता. मुळशी जि. पुणे), सुरदेव सिलोन नानावत (वय २५ रा. मातेरेवाडी शेळकेवाडी ता. मुळशी जि. पुणे), परलोक अरविंद रजपूत (वय १९ रा. उरुळी कांचन ता. हवेली जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. राम बिरावत हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली असून त्याच्यावर ग्रामीण पोलीस ठाण्यात चोरीचे ११ गुन्हे  दाखल आहेत.

केळावडे येथील दत्तमंदीरात २८ ऑक्टोबर रोजी चोरट्यांनी घरफोडी केली होती. चोरट्यांनी दत्त मंदीरातील चांदीच्या वस्तू, मुकुट, छत्री, प्रभावळ चोरुन नेले होते. याची फिर्याद नंदकुमार कोंडे यांनी राजगड पोलीस ठाण्यात दिली आहे. चोरट्यांनी त्याच रात्री परिसरातील सात ठिकाणी चोरी करुन लाखोचा मुद्देमाल चोरुन नेला होता.

या गुन्हयाचे गांभीर्य पाहून पुणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप जाधव, संदीप पखाले यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासा बाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक जीवन राजगुरू, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय गिरमकर, दिलीप जाधवर, दयानंद लिम्हण, चंद्रकांत झेंडे, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, राजू चंदनशिवे, जगदीश शिरसाठ, अक्षय जावळे यांचे पथकाने रेकोर्ड वरील गुन्हेगार यांची माहिती गोळा केली. ही माहिती गोळा करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना  बतमीदारामार्फत माहिती मिळाली की मंदीर चोरी व अट्टल घरफोड्या करणाऱ्या टोळीतील तीन इसम घोटावडे चौकात थांबले आहेत. यानंतर त्यांनी पथकाने घोटावडे येथे सापळा रचला. पोलिसांना पाहताच आरोपी पळून जात असताना पथकाने पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी पिरंगुट व केळावडे भागात मंदीर चोरी व घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. आरोपी हे रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्यांचे कडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.  यातील आरोपी राम बिरावत याचे विरुद्ध यापूर्वी मोका अंतर्गत कारवाई झाली असून त्याचे वर घरफोडीचे रायगड व पुणे ग्रामीण जिल्ह्यात ११ गुन्हे दाखल आहेत. तसेच सुरदेव नानावत याचे विरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असून रायगड जिल्ह्यात ४ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. तर परलोक रजपूत याचेवर पुणे ग्रामीण जिल्ह्यात ९ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास राजगड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे हे करीत आहेत