बनावट नोटा चलनात आणणारी टोळी गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बनावट चलनी नोटा तयार करुन त्या बाजारात चलनात आणताना गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने अटक केली आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून त्यांच्याकडून साडेचार लाख रुपयांच्या बनावट नोटा आणि साहित्य जप्त केले आहे. पोलिसांनी याप्रकरणात एकाला चेन्नई येथून अटक केली असून तो पुण्यातचा रहिवाशी आहे. तो या टोळीला बनावट नोटा पुरवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

राजेश चंद्रभान ढिलोड (वय 45,रा. सिद्धार्थनगर, नगर रोड), अलका रोहिदास क्षीरसागर (वय 40 रा. भाजी मार्केट चौक, ताडीवाला रोड), आनंद यशवंत जाधव (वय 36, रा. मुळेवाडी, आंबेगाव), सुनिता आनंद जाधव (वय 30, रा. मुळेवाडी, आंबेगाव) आणि वेंकटेश मुदलियार (वय 44, रा.पेरियापालम, तामिळनाडू) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

गुन्हे शाखा युनिट -२ चे पोलीस फौजदार अनिल उसुलकर व पोलीस नाईक यशवंत खंदारे यांना एक महिला आणि एक पुरुष ढोले पाटील रोड भागात बनावट चलनी नोटा वटविण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी या दोघांना सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १ लाख ६७ रुपये किंमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. पोलिसांनी त्यांच्याकडे केलेल्या सखोल चौकशीमध्ये आनंद जाधव आणि त्याची पत्नी सुनिता जाधव यांची नावे समोर आली. त्यांना १२ जानेवारीला अटक करुन त्यांच्याकडून २४ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. अटक केलेल्या आरोपींकडे पोलिसांनी अधिक तपास केला असता या बनावट नोटा चेन्नई येथील व्यंकटेश मुदलियार नावाचा इसम छापत असून त्या नोटा पुरवण्याचे काम तो करत असल्याचे समजले.

गुन्हे शाखेचे एक पथक चेन्नई येथे रवाना करून त्यांनी नोटा पुरवणाऱ्या आरोपीचा शोध घेतला. आरोपी उथ्थकोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असल्यची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने रात्री छापा टाकून मुदलियारला अटक केली. त्याच्या घराची झडती घेऊन पोलिसांनी तेथे बनावट नोटा छापण्यासाठी वापरण्यात आलेले प्रिंटर आणि इतर साहित्य जप्त केले. तसेच २०००, ५००, २०० आणि ५० च्या २ लाख ३५ हजार ४१० रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या.

अटक केलेला आरोपी व्यंकटेश हा मूळचा पुण्यातील असून त्याच्यावर खून, मारामारी, चोरी, अग्नी शस्त्र बाळगणे, फायरिंग यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. २००१ मध्ये झालेल्या पत्रकाराच्या खून प्रकरणात देखील त्याला अटक झाली होती. कोर्टाने त्याच्याविरुद्ध गैरजमानती वॉरंट काढले असून ते प्रलंबित असल्याचे देखील समोर आले. व्यंकटेश याने तामिळनाडू येथे कर्ज काढून ट्रक विकत घेतला होता. तो ड्रायव्हिंग करुन आपली उपजिवीका चालवित होता. त्याने त्याचा तेथील साथिदार श्रीहरी याच्या मदतीने जास्त पैसे कमावण्यासाठी यूट्यूबवरील व्हिडीओ पाहून बनावट चलनी नोटा छापण्याचा उद्योग सुरू केला. या नोटा बाजारात चलनात आणण्यासाठी त्याने पुण्यातील त्याच्या साथिदारांची मदत घेतली.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे प्रदिप देशपांडे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -१ समीर शेख यांचे मार्गदर्शनाखाली युनिट – २ चे प्रभारी पोलीस निरीक्षक गजानन पवार, सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव, लक्ष्मण ढेंगळे, सहायक पोलीस फौजदार अनिल ऊसुलकर, संजय दळवी, यशवंत आंब्रे, शेखर कोळी, पोलीस हवालदार अजय खराडे, दिनेश गडांकुश, विनायक जाधव, पोलीस नाईक यशवंत खंदारे, अतुल गायकवाड, चेतन गोरे, उत्तम तारु, दाऊद सैय्यद, विशाल भिलारे, किशोर वग्गू, महीला पोलीस नाईक भागवत, पोलीस शिपाई अजित फरांदे, कादिर शेख, चंद्रकांत महाजन, पोलीस शिपाई तोत्रे, गोपाळ मदने यांच्या पथकाने केली.