माझे कुठेही हॉटेल किंवा बार नाही; गौतमचे ‘गंभीर’ ट्वीट 

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय संघातील माजी सलामीवीर गौतम गंभीर याने गतवर्षात निवृत्ती जाहीर केली. तेव्हापासून त्याने समालोचक म्हणून आपली कारकिर्द घडवण्यासाठी सुरुवात केली आहे. मात्र आता गौतमने आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून एका गंभीर विषयावर ट्वीट केलं आहे. दिल्ली किंवा अन्य कुठेही माझे कोणतेही हॉटेल नाही, असे त्याने ट्विट केले आहे.

‘मित्रांनो, मध्य आणि पश्चिम दिल्लीत माझ्या नावाची अनेक हॉटेल, बार, पब आहेत. मात्र मी हे स्पष्ट करतो की अशा प्रकारच्या कोणत्याही हॉटेल किंवा पबमध्ये माझी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे गुंतवणूक नाही किंवा भागीदारी नाही. स्पष्टच सांगायचे झाले, तर माझे जगात कुठेही हॉटेल, पब किंवा बार किंवा तत्सम काहीही नाही’, असे त्यानं ट्वीट केले आहे.

प्रसिद्ध व्यक्तीच्या नवाने हॉटेल काढले तर ते खुप चालते. त्याचा व्यापार चांगला होतो. म्हणून अनेक लोक मोठ्या क्रिकेटपटूंच्या नावाने हॉटेल काढलेली दिसतात. त्यातील अनेक हॉटेल्सची मालकी क्रिकेटपटुंकडेदेखील आहे. याच पद्धतीने गौतम गंभीरच्या नावानेही दिल्लीत अनेक हॉटेल्स सुरु करण्यात आलेली दिसली. परंतू त्यातील आपलं वैयक्तीक एकही हॉटेल नाही. तसंच या हॉटेल्समध्ये भागीदारीही नाही, असं गंभीरने स्पष्ट केलं आहे.