सर्जेपुरात गीझरचा स्फोट, ३ जखमी

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाईन – सर्जेपुरा परिसरातील एका घरात गिझरचा स्फोट होऊन तीन जण जखमी झाले आहेत. त्यात दोन मुले व एका महिलेचा समावेश आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हा स्फोट झाला.
सर्जेपुरातील व्हिसेनपुरा परिसरात मंगळवारी रात्री उशिरा अचानक स्फोटाचा आवाज झाला. त्यामुळे परिसरातील रहिवाशांनी सदर आवाज आलेल्या घराकडे धाव घेतली. त्यावेळी पाठीमागील बाजूची भिंत पडलेली दिसली. तसेच पत्रे उचकटले होते. घरातील मुलांच्या ओरडण्याचा आवाज आला. दोन मुले व एक वृद्ध महिला असे तीन जण जखमी झाले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.
सुरुवातीला हा गॅस टाकीचा स्फोट वाटला. परंतु, गिझरच्या स्फोटाने तिघे जखमी झाल्याचे लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी जखमींवर उपचार सुरू आहेत. अचानक झालेल्या आवाजाने शहरातील नागरिकांनी मध्यरात्रीच्या सुमारास सर्जेपुरा परिसरात गर्दी केली होती.

कोणतीही तपास यंत्रणा नि:पक्षपाती नाही : जयंत पाटील