सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे नैराश्याचा धोका मुलींमध्ये अधिक 

लंडन : वृत्तसंस्था – इंटरनेट आजकाल अगदी सहजासहजी उपलब्ध होत आहे. इंटरनेट, सोशल मीडिया हे आजच्या पिढीसाठी देणगी आहे. परंतु सोशल मीडियाचा वापर करणे दिवसेंदिवस घातक होत चाललं आहे. आता हाच सोशल मीडिया त्याचा अतिवापर करणाऱ्या मुलांमध्ये डिप्रेशनसाठी कारणीभूत ठरत आहे. यामध्ये मुलांपेक्षा मुलींमध्ये डिप्रेशनचा धोका अधिक असतो असं एका अभ्यासातून समोर आलं आहे. लंडन कॉलेज विद्यापीठाने केलेल्या अभ्यासातून हा दावा करण्यात आला आहे.
युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन’च्या एका प्राध्यापकांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियाचा अतिवापर आणि नैराश्याची लक्षणे यांच्यातील संबंध मुलांच्या तुलनेत मुलींमध्ये जास्त दिसून येतो. सोशल मीडिया आणि नैराश्यातील संबंधाचा कार्यकारणभाव समजून घेण्याचा प्रयत्न संशोधकांनी केला तेव्हा इंटरनेटवरून छळणूक झाल्याचे प्रकार ४०% मुली आणि २५% मुलांनी अनुभवल्याचे स्पष्ट झाले आहे.
संशोधकांनी १४ वर्ष वयोगटातील ११ हजार मुलींचा अभ्यास केला यामध्ये दिवसातल्या पाच तासांपेक्षा जास्त वेळ सोशल मीडियावर घालवणाऱ्या ४०% मुलींमध्ये नैराश्याची लक्षणं दिसून आली. मुलांमध्ये हे प्रमाण १५ टक्क्यांपेक्षाही कमी आहे. सोशल मीडियाचा वापर न करणाऱ्या मुलींचे प्रमाण केवळ ४ %, तर मुलांचे १०% असल्याचे ही या अभ्यासातून समोर आले आहे.  सोशल मीडियाचा कमी वापर करणाऱ्या १२ टक्के मुलांमध्ये तसेच या माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर करणाऱ्या ३८ % व्यक्तींमध्ये अधिक तीव्र नैराश्याची लक्षणे आढळल्याचे या अभ्यासात नमूद केले आहे.