…’तो’ चक्क अंत्यसंस्कारापूर्वीच उठून बसला ; म्हणाला, यमदूतांनी दिले जीवनदान

चंदिगड : वृत्तसंस्था – लहानपणापासून आपण अनेक गोष्टींमध्ये ऐकले की, मानवाचा अंतकाळ जवळ आल्यानंतर त्याला नेण्यासाठी दोन यमदूत येतात, पण या यमदूतांनी कधी कुणाचे चुकून प्राण नेल्याचे अथवा एखाद्याला वरदान दिल्याचे आपण कधी ऐकलेय का ? असा धक्कादायक प्रकार खरंच घडला आहे. पंजाबमधील एका गावामध्ये असे घडल्याचे सांगण्यात येत आहे. चंदीगड येथील एका युवकाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याला मृत घोषित केल्यानंतर काही वेळाने त्याच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्कारांची तयारी सुरू केली. मात्र अंत्यसंस्कार करण्यापूर्वीच हा तरुण उठून बसला. आणि म्हणाला यमदूतांनी चुकून माझे प्राण नेले होते त्यांनी मला वरदान दिले आहे. असा दावा देखील या तरुणाने केला आहे.
हा धक्कादायक प्रकार पंजाबमधील बरनाला जवळील पक्खोकला गावात घडला असून, येथील रहिवासी सिंगारा सिंह यांचा मुलगा गुरतेज सिंह याची नजर अंधुक झाल्याच्या कारणावरून त्याला रुग्णालयात दाखल केले गेले होते. त्यावर उपचार करण्यासाठी त्याला चंदिगडमधील पीजीआय येथे दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्याला 11 जानेवारी रोजी डॉक्टरांनी मृत घोषित केले. मात्र, त्याचे डेथ सर्टिफिकेट त्याच्या कुटुंबीयांना दिले गेले नाही. मृत घोषित केल्यानंतर कुटुंबीयांनी गुरतेज याच्या अंत्यसंस्काराची तयारी केली.
अंत्यसंस्कारासाठी त्याचे कपडे बदलत असताना शेजाऱ्यांना त्याने श्वास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यांनी जवळच असलेल्या केमिस्ट दुकानात काम करणाऱ्या एका व्यक्तीला बोलावले. त्याने गुरतेजचा श्वासोश्वास सुरू असल्याचे सांगितले. त्याने असे सांगताच तो लगेच उठून बसला. त्यानंतर त्याचे कुटुंबीय त्याला सिव्हील रुग्णालयात घेऊन गेले. तेथील डॉक्टरांनी गुरुतेजला फरीदकोट येथील बाबा फरीद मेडिकल कॉलेज येथील रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या या गंभीर चुकिमुळे गुरतेजच्या कुटुंबीयांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याबाबत उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली आहे.