व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुकचा वापर ; मोबाईल चोरणार्‍याला हडपसर पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन-व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक आणि इतर समाज माध्यमांचा (सोशल नेटवर्किंग साईटस्) वापर करून शहरातुन महागडे मोबाईल चोरणार्‍याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 2 लाख 20 हजार रूपये किंमतीचे 8 मोबाईल जप्‍त करण्यात आले आहेत. त्याच्याकडून मोबाईल चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे.

मुशरफ बिलाल शेख (20) असे अटक केलेल्याचे नाव आहे. हडपसर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे आणि पोलिस कर्मचारी अमित कांबळे यांना आरोपी हा हडपसर परिसरात मोबाईल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती बातमीदारामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर पोलिस उपायुक्‍त प्रकाश गायकवाड, सहाय्यक आयुक्‍त सुनिल देशमुख यांच्या सुचनेनुसार आणि हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शिवाजी शिंदे, हमराज कुंभार, सहाय्यक निरीक्षक प्रसाद लोणारे, संजय चव्हाण, उपनिरीक्षक मंगेश भांगे, कर्मचारी औचारे, राजेश नवले, अनिल कुसाळकर, अमित कांबळे, शाहीद शेख आणि ज्ञानेश्‍वर चित्‍ते यांनी सापळा रचुन आरोपी मुशरफ शेख याला ताब्यात घेतली.

त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने ओएलएक्स वरून मोबाईल खरेदीच्या बहाण्याने काही जणांचे मोबाईल चोरल्याचे सांगितले. त्यासाठी त्याने व्हॉटस् अ‍ॅप आणि फेसबुकची देखील मदत घेतली. एवढेच नव्हे तर तो सोशल नेटवर्किंग साईटचा वापर करून मोबाईल विकत घेण्याचा बहाणा करून काही जणांना एखाद्या इमारतीसमोर बोलवायचा. त्यांचा मोबाईल घेवुन तो बहिणीला दाखवुन येतो असे सांगुन गायब होत होता. त्याने पुणे शहरात 8 जणांचे मोबाईल चोरले आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून 2 लाख 20 हजार रूपये किंमतीचे मोबाईल जप्‍त केले आहेत. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. वरिष्ठ निरीक्षक सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रसाद लोणारे अधिक तपास करीत आहेत.