अर्धा किलो सोने, लाखोची रोकड लंपास करणारे गजाआड

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – औरंगबाद शहरातील समर्थनगरमध्ये भरदिवसा बँक कर्मचाऱ्याच्या महिलेचे घर फोडून ५० तोळे सोन्याचे दागिने आणि लाखाची रोकड चोरुन नेणाऱ्या टोळीतील दोन जणांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. गुन्हे शाखेने गुन्हेगारांना बुलढाणा येथून अटक केली आहे. ही घटना ४ फेब्रुवारी रोजी घडली होती. न्यायालयाने संशयितांना १३ फेब्रुवारी पर्य़ंत पोलीस कोठडी सुनावली.

किरण सोपान चव्हाण (वय -१९) आणि कर्मा प्रकाश पवार (वय -२०, दोघे रा. बाराई, ता. मेहकर, जि. बुलडाणा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. समर्थनगर येथील व्यंकटेश अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सुनीता पुराणीक यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी लाखोचा ऐवज चोरुन नेला होता. याप्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज मिळाले होते. या फुटेजमध्ये पाच ते सहा जण गुन्हा करताना दिसून आले होते. सीसीटीव्ही फुटेजवरुन गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या टोळीचा शोध सुरु केला. तपासादरम्यान ही टोळी बुलढाणा जिल्ह्यातील असल्याचे समोर आले. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमोल देशमुख आणि कर्मचाऱ्यांचे पथक बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथे गुन्हारांचा शोध घेण्यासाठी गेले होते. मेहकर येथे शोध घेऊन पोलिसांनी संशयित आरोपी किरण चव्हाण आणि कर्मा पवार यांना ताब्यात घेऊन औरंगाबादमध्ये आणले.

या टोळीने पुराणीक यांच्या घरी चोरी करण्या आगोदर त्यांच्या घराची रेकी केली होती. चोरी केली केल्यानंतर गुन्ह्यातील मुद्देमाल चोरट्यांनी आपापसात वाटून घेतला होता. चोरलेला मुद्देमालाची विक्री करण्याच्या तयारीत असताना गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींनी या गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.