‘ती’च्या खुन्याला फाशी द्या, संतप्त नागरिकांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा  

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – विशाखाच्या खुन्याला फाशी द्या, खुनाची सखोल चौकशी करा, अशा घोषणा देत संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील ग्रामस्थांनी मुंबई-गोवा महामार्ग दणाणून काढत संगमेश्वर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. निवेदन देऊन या मोर्चाची सांगता करण्यात आली. यावेळी पोलीस उपअधीक्षक बाजीराव पाटील यांनी मोर्चेकऱ्यांना विशाखाच्या कुटुंबीयांना न्याय देऊ, असे आश्वासन दिले. यामुळे संतप्त मोर्चा शांत झाला.

विशाखाला न्याय मिळावा यासाठी कसबा येथील ग्रामस्थांनी सेना सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चाला सुरुवात केली. हा मोर्चा निषेधाचे फलक घेऊन व विविध घोषणांचे फलक घेऊन काढण्यात आला. मोर्चा कसबा येथून शास्त्री पूल, पैसाफंड, बसस्थानकमार्गे संगमेश्वर पोलीस ठाणे असा काढण्यात आला.

मोर्चातील ग्रामस्थांची उपस्थिती ही लक्षणीय होती. यात महिलांचाही सहभाग होता. विशाखा महाडिक हिचा सुनील गुरव याने खून केला होता. या आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे या मागणीसह या खुन्याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी घेऊन हा मोर्चा दणाणून काढला. विशाखा बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबीयांनी दिली होती. याकडे संगमेश्वर पोलिसांनी दुर्लक्ष केले. यातच विशाखाचा प्राण गेला, असा आरोप ग्रामस्थांनी करून हा मोर्चा काढण्यात आला.

मोर्चातील मागण्यांचे निवेदन उपअधीक्षक बाजीराव पाटील, पोलीस निरीक्षक उदय झावरे यांना देण्यात आले. या मोर्चाला संबोधताना राजेंद्र महाडिक यांनी ग्रामस्थांना शांत केले. तसेच पाटील यांनीही योग्य प्रकारे या खुनाचा तपासकेला जाईल, असे सांगितले. यावेळी मुरलीधर बोरसुतकर, पं. स. सदस्य सुजित महाडिक, गावचे सरपंच अनंत शिगवण, उपसरपंच प्रसाद फाटक, माजी सरपंच चंद्रकांत महाडिक, प्रकाश घाणेकर आदींसह सुमारे ५०० हून अधिक ग्रामस्थ मोर्चात सहभागी झाले होते.