अण्णा हजारेंच्या संबंधी बोलणे, वाचणे मी सोडून दिले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अण्णा हजारे आणि शरद पवार यांच्यात अनेक मुद्द्यावर मतभिन्नता असल्याने त्यांच्यामध्ये अनेकदा वाद निर्माण झाल्याचे महाराष्ट्राने पहिले आहे. अण्णा हजारे यांच्या उपोषणावर प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी आपण अण्णा हजारे यांच्या उपोषणावर वाचणे आणि बोलणे सोडून दिले आहे असे खोचक उत्तर दिले आहे.

राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार निश्चित करण्याच्या दृष्टीने काल पुण्यातील बारामती हॉस्टेल येथे शरद पवार यांनी  पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलवली ती बैठक पार पडताच शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

अण्णा हजारे यांच्यावर बोलायचे, पाहायचे आणि वाचायचे नाही असे आपण तीन वर्षांपूर्वी ठरवले आहे. त्यांच्या विषयी कोणतेही वृत्त छापून आले तरी आपण ते वृत्त वाचत नाही अथवा पाहत हि नाही असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.

नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर शरद पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी त्यावर हि टीकात्मक उत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण लोकसभेत झाल्याने आपण ते भाषण ऐकले नाही. परंतु मोदी यांनी आपले भाषण त्यांच्यावर झालेल्या संस्कारानुसारच दिले असेल असे शरद पवार म्हणाले आहेत.