मुख्याध्यापक मोदींना दीड लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडले

बीड : पोलीसनामा ऑनलाईन

शिक्षणाधिकार्‍यांकडे बाजु मांडण्यासाठी लिपीकाकडून दीड लाख रूपयाची लाच घेणार्‍या मुख्याध्यापकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई आज (शनिवारी) परळी येथील देशमुख पार जवळील पेठ गल्‍लीमध्ये झाली असुन मुख्याध्यापका विरूध्द परळी शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 2018 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदकिशोर पापालाल मोदी (55, रा. पेठ गल्‍ली, देशमुख पार, परळी, जि. बीड) असे लाचखोर मुख्याध्यापकाचे नाव आहे. याप्रकरणी वैद्यनाथ विद्यालयात लिपीक असणार्‍याने औरंगाबादच्या एसीबीकडे तक्रार दिली होती. याबाबत अधिक माहिती अशी की, सन 2012 मध्ये तक्रारदार हे परळी येथील वैद्यनाथ विद्याललयात कनिष्ठ लिपीक म्हणुन कार्यरत होते. सन 2012 मध्ये संस्थेने 4 शिक्षक आणि एका लिपीकाची नेमणुक नियमबाहय असल्याचे कारणावरून त्यांना सेवेतुन कार्यमुक्‍त केले होते. संबंधितांनी संस्थेच्या आदेशाविरूध्द औरंगाबाद येथील न्यायालयात अपिल केले होते. त्यावर सुनावणी झाली आणि दि. 21 डिसेंबर 2017 रोजी न्यायालयाने संबंधितांना सेवेत रूजु करून घेण्याचे आदेश दिले होते. दि. 15 मार्च 2018 रोजी शाळेचे मुख्याध्यापक मोदी यांनी न्यायालयाच्या आदेशाचे अनुपालन करण्यासाठी तक्रारदार यांच्यासह 4 कर्मचार्‍यांना पत्र देवुन आवश्यक कागदपत्रे सात दिवसाच्या आत सादर करण्याचा आदेश दिला. त्यानंतर मुख्याध्यापक मोदी यांनी तक्रारदारांना बोलावुन सांगितले की, सेवा समाप्‍त कर्मचार्‍यांपैकी 2 कर्मचार्‍यांनी, शिक्षण उपसंचालक (औरंगाबाद) यांच्याकडे तक्रार केली असून त्याची चौकशी शिक्षणाधिकारी यांच्याकडे चालु आहे. सदर चौकशीमध्ये मुख्याध्यापक मोदी यांनी तक्रारदार लिपीक यांची बाजु मांडण्यासाठी 2 लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्दा नसल्याने तक्रारदाराने दि. 28 ऑगस्ट 2018 रोजी एसीबीकडे तक्रार केली.

पुणे : हिंजवडीतून ५६ कंपन्यांनी स्थलांतर केल्याची चर्चा

तक्रारदाराच्या तक्रारीची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर पोलिस अधीक्षक श्रीकांत परोपकारी, अप्पर पोलिस अधिक्षक एस.आर. जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधिक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील, पोलिस निरीक्षक गजानन वाघ, कर्मचारी कल्याण राठोड, मनोज गदळे, घोलप, गारदे, पोलिस हवालदार अशोक ठोकळ, दादासाहेब केदार, पोलिस नाईक विकास मुंडे, अमोल बागलाने आणि चालक नदीम यांनी आज (शनिवारी) परळी येथील देशमुख पार परिसरातील पेठ गल्‍ली येथे सापळा रचला. 2 लाखाच्या लाचेच्या मागणीपैकी दीड लाख रूपये मुख्याध्यापक मोदी यांनी सरकारी पंचासमक्ष स्विकारले. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. उर्वरित रक्‍कम एक महिन्याच्या आत देण्यास मोदी यांनी तक्रारदार लिपीकास सांगितले होते. लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत नागरिकांनी एसीबीकडे तक्रार करावी अथवा टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा असे आवाहन पोलिस अधिक्षक श्रीकांत परोपकारी यांनी केले आहे.