9 वी च्या विद्यार्थीनींच्या पाठीवरून हात फिरवणार्‍या मुख्याध्यापकाची आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – इयत्‍ता 9 वीच्या विद्यार्थीनींच्या पाठीवरून हात फिरवणार्‍या मुख्याध्यापकास डोणजे गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी शाळेत जावुन जाब विचारला. त्यानंतर दबावाखाली येवुन मुख्याध्यापकाने कॅनॉलच्या पाण्यामध्ये उडी मारून आत्महत्या केली. दरम्यान, मुख्याध्यापकास आत्महत्या प्रवृत्‍त केल्याप्रकरणी 3 महिलांसह पाच जणांविरूध्द सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक कावरे असे आत्महत्या केलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. याप्रकरणी अशोक कावरे यांच्या पत्नी वर्षा अशोक कावरे (49, रा. रश्मी हाऊस, लगडमळा, सिंहगड रोड, वडगाव) यांनी फिर्याद दिली असुन पोलिसांनी नवनाथ पारगे, पुजा पारगे, रोहिणी कुंभार, बाळासाहेब पारगे आणि सुवर्णा चव्हाण (सर्व रा. डोणजे) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. अशोक कावरे हे डोणजे येथील विद्या निकेतन माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक म्हणुन कार्यरत होते. त्यांनी शाळेतील काही विद्यार्थ्यांना व विद्यार्थीनींना कोणत्यातरी कारणावरून शिक्षा केली होती. त्यामुळे गुन्हा दाखल झालेल्या पाच जणांनी संगणमत करून कावरे यांना मारहाण केली. घडलेल्या प्रकाराच्या मानसिक दबावाखाली येवुन दि. 24 सप्टेंबर रोजी कावरे यांनी कॅनॉलच्या पाण्यामध्ये उडी मारून आत्महत्या केली. वर्षा कावरे यांच्या फिर्यादीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मात्र, याबाबत अधिक माहिती घेतली असता अशोक कावरे हे शाळेतील इयत्‍ता 9 वी मधील विद्यार्थीनींना शिक्षा म्हणून कधी-कधी मारहाण करीत होते. त्यावेळी ते विद्यार्थीनींच्या पाठीवरून हात फिरवत होते. ते विद्यार्थीनींना अजिबात आवडत नव्हते. म्हणून काही विद्यार्थीनींनी ही बाबत डोणजे गावातील काही महिला सामाजिक कार्यकर्त्यांना सांगितली. त्यानंतर महिला कार्यकर्त्यांनी त्याचा जाब शाळेत जावुन विचारला तसेच कावरे यांच्याबाबत वरिष्ठांकडे तक्रार देखील केली होती. त्याची चर्चा सर्वत्र होण्यास सुरवात झाली. त्यानंतर कावरे यांनी आत्महत्या केली अशी माहिती डोणजे गावातील विश्‍वसनीय सुत्रांनी दिली आहे. सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी गुन्हयाचा अधिक तपास करीत आहेत.