चाकण मध्ये एकाला बेदम मारहाण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – जुन्या वादातून एकास गंभीर मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर चाकण पोलिसांत शुक्रवारी (दि.१) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर मारहाणीची घटना बहुळ येथील सुभाष विद्यालयाजवळील मोरया हॉटेलमध्ये घडली.
अक्षय अर्जन जाधव (१८ वर्ष, रा. बहुळ ता. खेड) या युवकाने चाकण पोलिसांत तक्रार दिली आहे.

सागर नामदेव पाबळे (रा मोहितेवाडी ता.खेड जि.पुणे), प्रमोद उर्फ भावड्या बाळासाहेब साबळे (रा.बहळ ता.खेड जि.पुणे) व मनोज विनयकांत शर्मा (रा. मेदनकरवाडी गवतेवस्ती ता.खेड जि.पुणे) या तिघांवर या मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय हा मागील आठवड्यात गावातील त्याचे मित्र सोहेल शेख, सिध्देश वाडेकर यांच्या समवेत बहुळ येथील सुभाष विद्यालयाजवळील मोरया हॉटेलमध्ये भेळ खाण्यासाठी गेला होता. भेळ खात असताना तेथे फिर्यादी अक्षय याच्या ओळखीचे सागर पाबळे, प्रमोद साबळे व मनोज शर्मा हे तिघेजण आले.

सागर पाबळे याचे हातात खो-याचे लाकडी दांडके होते व प्रमोद साबळे यांचे हातात वायर होती. त्यावेळी सागर पाबळे याने ‘तू मागच्या वर्षी मला व माझे दाजीला शिव्या दिल्या होत्या काय, तुला लय माज आला आहे’ असे म्हणुन त्या तिघांनी फिर्यादी अक्षय यास शिवीगाळ दमदाटी केली. सागर पाबळे याने त्याचे हातातील खोऱ्याचे लाकडी दांडक्याने तसेच प्रमोद साबळे याने त्याचे हातातील वायरने अक्षय यास मारहाण केली. त्यात अक्षय बेशुद्ध झाला. अक्षयच्या नातेवाईकांनी त्यास रुग्णालयात दाखल केले. शुक्रवारी चाकण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.