‘या’ जिल्ह्यात गारपीटीने शेतकऱ्यांचे नुकसान, २४ तासात पुन्हा पावसाची शक्यता

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – सावनेर, मौदा, पारशिवणी या नागपूर जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये आज अचानक अवकाळी पाऊस आणि गारपीटीने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. त्यासोबतच नाशिक, भंडारा जिल्ह्यातही वादळी वारा आणि वीजेच्या गडगडाटासह गारा आणि पाऊस पडला. येत्या २४ तासात पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली असून धान्याची योग्य साठवण करून ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

नागपूरसह भंडारा, नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने आज हजेरी लावली. नागपूर जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सध्या गहू, हरभऱ्याचं पीक काढण्यात येत आहे. दरम्यान यासह आंबा व संत्र्यांच्या बागांचंही नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. पाणी टंचाई आणि हवामानाची साथ नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं आहे.

दरम्यान, हवामान खात्याकडून येत्या २४ तासात पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर शेतकऱ्यांना आपले धान्य काळजीपुर्वक झाकून ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.