आमचा फक्त शिस्तीसाठी खटाटोप ; हेल्मेटसक्तीबाबत पुणे पोलिसांचा ‘यु टर्न’ 

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून पुण्यात हेल्मेट सक्ती करण्यात आली होती. काही पुणेकरांचा, काही संस्था ,संघटना, राजकीय पक्षांनी हेल्मेटसक्तीला तीव्र विरोध दर्शवला होता. हेल्मेटसक्तीबाबत बोलताना पुण्याच्या वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्विनी सातपुते म्हणाल्या हेल्मेटसक्तीची आम्ही कोणतीही तारीख जाहीर केली नव्हती. त्यासाठी कायदा आहेच. त्यामुळे कारवाई करण्यासाठी कोणताही दिवस ठरवण्याची आवश्यकता नाही. आम्ही केवळ नागरिकांना शिस्त लागावी यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगत यु टर्न घेतला.
एकीकडे पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी १ जानेवारीपासून हेल्मेटसक्तीची घोषणा केली होती. एवढेच काय हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकी चालकाला ५०० रुपये दंड  आकारण्यात येणार असे देखील सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात १ जानेवारी उजाडल्यानंतर अनेक पुणेकरांनी संघटनांनी, एवढेच काय राजकीय पक्षांनी हेल्मेट सक्तीला तीव्र विरोध दर्शवल्यानंतर मात्र वाहतूक शाखेच्या उपायुक्तांनी मात्र यावर सारवासारव केली आहे. त्यामुळे आपसातच ताळमेळ नसल्याचे त्यांच्या या विधानांवरून स्पष्ट होते आहे.
दरम्यान, हेल्मेटसक्तीविरोधात पुणेकर ३ जानेवारीला विनाहेल्मेट दुचाकी रॅली काढणार आहेत. पत्रकार संघ ते पुणे पोलीस आयुक्तालय अशी रॅली काढून पुणेकर विरोध प्रदर्शन करणार आहेत. रॅलीनंतर पुणे पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांना निवेदन दिले जाणार आहे. हेल्मेटसक्ती विरोधी कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.