हेल्मेटधारी दुचाकीचालकांचे पोलीसांकडून गुलाबपुष्पाने स्वागत

कात्रज : पोलीसनामा ऑनलाइन – एक जानेवारीपासून दुचाकीचालकांना हेल्मेटची सक्ती करण्यात येणार असून, त्याचाच एक भाग आज सकाळी हेल्मेट वापरणाऱ्या दुचाकीचालकांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. हा उपक्रम भारती विद्यापीठ वाहतूक पोलीस विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर ताकवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद नलवडे पोलीस कर्मचारी आणि नागरिकांच्या सहकार्याने राबविण्यात आला.

कात्रज चौक ते वडगाव महामार्ग रस्ता, सातारा रस्ता कात्रज डेअरी चौक, राजश्री शाहू बँक चौक तसेच कोंढवा रोड राजस चौक येथे हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच, ज्यांनी हेल्मेट घातले नाही, त्यांना हेल्मेट घालण्याचे फायदे सांगून हेल्मेट वापरा अशा सूचना करण्यात आल्या.

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर ताकवले म्हणाले की, काही कंपनीचे कर्मचारी, तसेच सेनेतील जवान किंवा पोलीस मुख्यालय आवारात काम करणारे कर्मचारी हेल्मेटचा वापर पूर्वीपासूनच करीत आहेत, दुचाकी अपघातात हेल्मेटमुळे अनेकांचे जीव वाचले आहेत. हेल्मेटमुळे प्रवासाचा ताण, प्रदूषण व धुळीपासून संरक्षण होते. हेल्मेट वापरण्याचे अनेक फायदे असल्याने ते वापरावे, आपण दहा हजाराच्या मोबाईल खराब होऊ नये म्हणून स्किनगार्ड लावतो, मात्र, स्वत:च्या जीवाची किंवा डोक्याची काळजी घेत नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.