सिद्धू’चा शिरच्छेद करणाऱ्या १ कोटींचे बक्षीस

आग्रा : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविषयी नवज्योत सिंग सिद्धू यांनी अपशब्द वापरले होते. यामुळे हिंदू युवा वाहिनी आणि विश्व हिंदू परिषदेने याचा तीव्र निषेध केला आहे. या संघटनेच्या कार्यकत्र्यांनी सिद्धूंचा पुतळा जाळला. तसेच त्यांचा शिरच्छेद करणाऱ्याला एक कोटींचे बक्षीस जाहीर केले आहे. पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी राजस्थानमधील सभेत नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर सडकून टीका केली होती.

चौकीदार म्हणजेच नरेंद्र मोदी तर चोर आहेतच त्यासोबत चौकीदार का कुत्ता भी चोर है म्हणत योगी आदित्यनाथांना कुत्र्याची उपमा दिली होती. योगी आदित्यनाथ योगी नसून भोगी असल्याची कडवी टीकाही त्यांनी यावेळी केली. सिद्धूंनी खालच्या पातळीवर जाऊन केलेल्या या टीकेमुळे चिडलेल्या योगी आदित्यनाथ यांचे समर्थक असलेल्या हिंदुत्ववादी संघटनांनी सिद्धूंचा शिरच्छेद करुन त्यांचे मुंडके आणणाऱ्याला १ कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे.

हिंदु युवा वाहिनीचे आगरामधील अध्यक्ष तरुण सिंह यांनी सिद्धूंच्या पाकिस्तान भेटीवरुनही निशाणा साधत ते पाकिस्तानचे दलाल असल्याचे म्हटले आहे. सिद्धू देशद्रोही असल्याचे म्हणत त्यांनी सिद्धू आगरा शहरात आल्यावर त्यांच्या शरीराचे तुकडे करुन फेकून देऊ, अशी धमकी दिली आहे. सिद्धु यांना ठार मारण्याची धमकी देत योगी आदित्यनाथांच्या समर्थकांनी आगऱ्यामध्ये गुंडागिरी चालवली आहे.