हिंजवडी पोलिसांकडून सराईत टोळी गजाआड

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन- हिंजवडी पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची टोळी गजाआड केली आहे. ही टोळी बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत होती, त्यावेळी पोलिसांनी तीन सराईतांना अटक केली. तर अन्य सहा जण पळून गेले. ही घटना आज (बुधवारी) मध्यरात्री हिंजवडी येथे सुस गाव रस्त्यावर घडली.

रोहीत लक्ष्मण गायकवाड (२३, रा. थेरगाव), अक्षय राजेंद्र फुगे (२०, रा. जगताप डेअरी), आषिश कैलास कांबळे (२०, रा. थेरगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अक्षय साबळे, किसन कांबळे, ओंकार फडतरे, बंदर उर्फ दिपक सावंत, मंन्त्या, हम्या चंदनशिवे हे सहाजण पळून गेले आहेत. अक्षय साबळे हा कुविख्यात रावण टोळीचा सदस्य आहे. तसेच तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. १३) रात्री नऊच्या सुमारास सुसगाव रोडवरील स्मशान भूमीजवळ मोकळ्या मैदानात काही तरुण संशयीत दुचाकी गाड्यांवर थांबले आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरीष्ट पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शिवाजी गवारे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश धामणे, पोलीस उप निरीक्षक अशोक गवारी, पोलीस हवालदार किरण पवार, बाळकृष्ण शिंदे, पोलीस नाईक विवेक गायकवाड, अतिक शेख, पोलीस शिपाई विकी कदम, सुभाष गुरव या पथकाने
सापळा रचला. त्यावेळी टोळके कोणत्यातरी गुन्ह्याची तयारी करत असल्याचा संशय आला. पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. पोलीस आल्याची चाहूल लागताच सर्वजण पळून जाऊ लागले. पोलिसांनी पाठलाग करून तिघांना पकडले. तर अन्य सहा जण पळून गेले.

ताब्यात घेतलेल्या तिघांकडे चौकशी केली असता ते बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएमवर दरोडा टाकणार असल्याची कबुली दिली. त्यावरून त्यांना अटक केली. त्यांच्याकडून एक पिस्तूल, एक जिवंत काडतूस, चार कोयते, मिरची पूड, दोन दुचाकी असा एकूण एक लाख १० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अटक केलेल्या तिघांनी आणि फरार असणाऱ्या सराईत गुन्हेगारांनी यापूर्वी तळेगाव, हिंजवडी, पिंपरी-चिंचवड परिसरात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. मात्र अनेक गुन्हे दाखल न झाल्याने त्यांचे फोफावले होते. तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.