तक्रारकर्त्यास बेदम मारहाण ; पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाइन – तक्रार दिली ना दिली, तोच तत्काळ गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरला. एवढ्यावरच न थांबता पोलिसांना शिवीगाळ करून धमक्या दिल्या. यामुळे चिडलेल्या पोलिसांनी स्वस्त धान्य दुकानदार संजय टेकाळे याला बेदम मारहाण केली. ही घटना २७ डिसेंबर रोजी बुलडाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये घडली. दरम्यान, पोलीस अधीक्षकांनी उपरोक्त पोलीस हवालदारास शुक्रवार २८ डिसेंबर रोजी तडकाफडकी निलंबित केल्याचा आदेश जारी केला. यामुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

बुलडाणा येथील रमेश परसे व रुईखेड टेकाळे येथील संजय पूर्णाजी टेकाळे या रेशन दुकानदारांमध्ये आर्थिक व्यवहारातून वाद झाले होते. यासंदर्भात टेकाळे यांनी २७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता बुलडाणा शहर पोलिसांत तक्रार दाखल करून तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. विनाचौकशी गुन्हा दाखल होत नाही, असे उपस्थित कर्मचाऱ्याने टेकाळे यांना सांगितले. त्यावर टेकाळे यांनी चिडून उपस्थित कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला घातला. तसेच त्यांना शिवीगाळ केली. यामुळे पोलिसांनी संजय टेकाळे यास चांगलाच चोप दिला.

आ. हर्षवर्धन सपकाळ यांना ही बाब समजताच त्यांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली. पोलिसांना धारेवर धरत ‘सीसीटीव्ही’ फुटेजची मागणी केली. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे संबंधित पोलिस कर्मचाऱ्यास निलंबित करण्याचा आग्रह धरला होता. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी आज २८ डिसेंबर रोजी पोलीस हवालदार देवीदास चव्हाण यांना तडकाफडकी निलंबित केले.