राजकीय

प्रियंका गांधींची ट्विटरवर एंट्री

लखनौ : वृत्तसंस्था – काही दिवसांपूर्वी प्रियंका गांधींकडे काँग्रेसचे महासचिव पद आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. प्रियंका गांधींच्या राजकीय कारकिर्दीला आज प्रारंभ होत आहे. त्यांच्या राजकीय एंट्रीनंतर आता त्यांची सोशल मीडियावरही एंट्री झाली असून प्रियंका ट्विटरवर सक्रिय झाल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली आहे . प्रियंका यांनी ट्विटरवर एंट्री करताच अवघ्या तासाभरात त्यांचे २० हजारच्या वर फॉलोअर्स झाले. ट्विटरवर एकही ट्विट न करता सुरू करण्यात आलेले हे ट्विटर अकाउंट व्हेरिफाइ़ड आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रियांका यांच्यावर पूर्वोत्तर उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रियंका आतापर्यंत सक्रिय राजकारण आणि सोशल मीडियापासून दूरच होत्या. त्यांनी ७ जणांना फॉलो करायला सुरुवात केली आहे. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल, माध्यम प्रवक्ते रणदीप सुरजेवाला, उत्तर प्रदेश प्रभारी ज्योतिरादित्य शिंदे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि काँग्रेस पक्ष यांचा समावेश आहे.

प्रियंका गांधीचं मिशन उत्तर प्रदेश-

दरम्यान प्रियंका व राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अन्य नेत्यांसह आज उत्तरप्रदेशमध्ये लखनऊ विमानतळ ते काँग्रेस प्रदेश मुख्यालयापर्यंतचा रोड शो करून शक्तिप्रदर्शन केलं. प्रियंका उद्यापासून मिशन उत्तर प्रदेशला सुरुवात करतील. तीन दिवस त्या उत्तर प्रदेशमध्येच थांबून इथल्या किमान ४२ लोकसभेच्या जागांवर काँग्रेसची ताकद किती आहे, याचा अंदाज घेतील.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या